व्हिडीओकॉननचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक

नवी दिल्ली : व्हिडीओकॉननचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक केली आहे. याआधी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली होती. व्हिडीओकॉन समूहाल दिलेल्या कर्जमध्ये अनियमितता केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

चंदा कोचर यांनी मे २००९ मध्ये आयसीआयसीआय बँकेचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी व्हिडीओकॉन कंपनीला १,८७५ कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररीत्या मंजूर केल्याचा आरोप आहे. हे कर्ज २०१७ मध्ये एनपीएमध्ये गेले. या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांना व्हिडीओकॉनकडून ६४ कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचा आरोप आहे. व्हिडीओकॉन समूहातील एक कंपनी ‘नूपॉवर रिन्युएबल्स’च्या माध्यमातून हा पैसा दीपक कोचर यांच्या कंपनीला मिळाला, असे ईडीने म्हटले होते.

नेमकं काय आहे प्रकरण?
२०१२ मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपला आयसीआयसीआय बँकेद्वारे लोन देण्यात आलं होतं. हे प्रकरण नंतर एनपीए झालं. तसंच हा फ्रॉडही कसा झाला तेदेखील समोर आलं. २०२० मध्ये ईडीने या प्रकरणात दीपक कोचर यांना अटक केली. २०१२ मध्ये चंदा कोचर यांच्या नेतृत्वात आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन ग्रुपला ३२५० कोटींचं कर्ज दिलं.

त्यानंतर वेणुगोपाल धूत प्रमुख असलेल्या सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्यूएबल्सला ६४ कोटींचं लोन दिलं. या कंपनीत दीपक कोचर ५० टक्के भागिदारी होती. त्यामुळे हा सगळा घोटाळा कसा झाला ते समोर आलं. आता या प्रकरणात वेणुगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉनचे शेअर होल्डर अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबी यांना पत्र लिहून व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांनी एकमेकांचा लोन प्रकरणात कसा फायदा करून दिला या सगळ्या बाबी सविस्तर लिहिल्या होत्या.

धूत यांच्या व्हिडिओकॉन कंपनीला आयसीआयसीआय बँकेने ३२५० कोटींचं लोन दिलं. त्यानंतर वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक यांचा व्यावसायिक फायदा करून दिला. अरविंद गुप्ता यांच्या पत्रानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं.

Share