नागपुर शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीला आजपासून सुरुवात

नागपूर : नागगूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. आजपासून मतदार नाव नोंदणीस सुरुवात होणार असून ही नोंदणी ७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. दावे आणि हरकती, सूचना ही प्रक्रिया पार पडल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी प्रारूप आणि त्यानंतर ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या ६ वर्षांच्या कालावधीत तीन वर्षे अध्यापन केलेले शिक्षक मतदान करण्यासाठी पात्र असणार आहेत. निवडणुकीच्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली.

नागपूर विभाग शिक्षकमतदारसंघातील विद्यमान सदस्य नागो गाणार यांचा कार्यकाळ ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू होणार असून, ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

मागील वर्षी ३५ हजारांच्या जवळपास मतदार नोंदणी झाली होती. यावर्षी त्यापेक्षा अधिक नोंदणी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याकरिता सर्व राजकीय पक्ष व १२ संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक १२ घेण्यात येणार असून, जनजागृतीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हायस्कूलमध्ये मागील ६ वर्षांत ३ वर्ष शिक्षण सेवेत असणान्यास मतदार होता येणार असल्याचे त्यांना सांगितले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार राहुल सारंग उपस्थित होते.

कोण करू शकतो मतदान
नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील माध्यमिक व त्यावरील शैक्षणिक संस्थांमध्ये १ नोव्हेंबर २०१६ ते १  नोव्हेंबर २०२२ या सहा वर्षाच्या कालावधीत सलग किंवा टप्प्याटप्प्याने किमान ३ वर्ष शिक्षक म्हणून सेवा केलेला शिक्षकच यासाठी पात्र मतदार आहे. शैक्षणिक कार्य केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. सोबतच निवडणूक आयोगाचा फॉर्म १९ भरणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी प्रत्येक निवडणुकीला नव्याने मतदार यादी तयार होते यासाठी दरवेळी नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत मतदारालाच मतदान करण्याचा हक्क आहे.

Share