मुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज (सोमवार) सकाळी ९ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे ६ आणि भाजपचे ५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, राज्यसभा निवडणुकीनंतर आज होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर आता महाविकास आघाडी सावध झाली असून, मागच्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे या अटीतटीच्या निवडणुकीच्या निकालाबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
विधान परिषदेच्या १० रिक्त जागांसाठी आज निवडणूक होत असून, ११ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपकडून विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड, शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री एकनाथ खडसे तर काँग्रेसच्या वतीने चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप हे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप विरुद्ध भाजपचे प्रसाद लाड यांच्यात कडवी लढत होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी चुरशीची लढत झाली होती. त्यात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अचूक रणनीती आणि कौशल्यामुळे भाजपचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव करून विजय मिळवला होता. राज्यसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती विधान परिषद निवडणुकीत होणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दावा करीत आहेत, तर भाजपचा पाचवा उमेदवारही निवडून येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अन्य नेते व्यक्त करीत आहेत. या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर सायंकाळी पाचनंतर मतमोजणी सुरू होणार आहे.
आज सकाळी नऊ वाजता विधान भवनात मतदानास प्रारंभ झाला. भाजप नेते हरिभाऊ बागडे यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या पहिल्या एक तासात ६५ आमदारांनी मतदान केले. यामध्ये भाजपच्या ५० तर राष्ट्रवादीच्या १५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या १०४ आमदारांनी मतदान केले आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे गंभीर आजारी असूनही त्यांनी कुटुंबीयांसह रुग्णवाहिकेतून मुंबईत विधानभवनात जाऊन मतदान केले. राज्यसभा निवडणुकीतदेखील या दोन्ही आमदारांनी रुग्णवाहिकेतून जात मतदानाचा हक्क बजावला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आ. आशीष शेलार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर आदी नेते विधानभवनात दाखल झाले असून, आपापल्या पक्षाच्या आमदारांकडून मतदान करून घेत आहेत. संजय कुटे, अतुल भातखळकर आणि आशिष शेलार हे भाजपचे पोलिंग एजंट असून, प्राजक्त तनपुरे, अनिल पाटील, संजय बनसोडे राष्ट्रवादीचे तर अस्लम शेख, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमर राजूरकर हे काँग्रेसचे पोलिंग एजंट आहेत.
या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. भाजपचा पाचवा आणि काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराकडे विजयासाठी पुरेशी मते नाहीत. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या २९ आमदारांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपला पाच जागा जिंकण्यासाठी १३० मतांची गरज आहे. राज्यसभेत भाजपला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. यातूनच भाजपचे नेते विधान परिषदेच्या पाचही जागा जिंकण्याबाबत आशावादी आहेत.
या निवडणुकीत लहान पक्ष व अपक्ष आमदारांची १५ मते असून, ती निर्णायक ठरणार आहेत. बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन ‘बविआ’च्या तीन मतांसाठी साकडे घातले. मात्र, आ. हितेंद्र ठाकूर यांनी कुणाला मतदान करणार याविषयी अद्याप काहीही भाष्य केलेले नाही. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर हे नातेवाइकाच्या उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये गेले होते. ते आज मतदानासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.