ग्रामपंचायतींसाठी आता १३ ऐवजी १६ ऑक्टोबरला मतदान

मुंबई :  राज्यातील विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

तर मतमोजणी १४ ऑक्टोबर ऐवजी आता १७ ऑक्टोबरला होईल. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ०७ सप्टेंबर २०२२ रोजी १ हजार १६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७. ३० ते सायंकाळी ५. ३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. मतमोजणी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल.

मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही निवडणूक होणार आहे.

Share