मुंबई : पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. ईडीच्या कारवाईमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. दरम्यान आता यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिय येत आहेत. संजय राऊतांवरील कारवाईमुळे शिवसैनिकाला आनंद झाला असेल अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी दिली आहे.
संजय शिरसाठ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘शिवसैनिक आज आनंदी झाला असेल. संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच शिवसेनेत फूट पडली. ४० आमदार आणि १२ खासदार बाहेर पडले. हे सर्व आनंदी आहेत. राऊत हे प्रवक्ता होते मास लीडर नाही. त्यामुळं त्यांच्यावरील कारवाईने कार्यकर्त्यांचा उठाव वगैरे होणार नाही, ‘असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्याकडे प्रखर वाणी आणि लेखणीवर प्रभुत्व आहे, त्याआधारे त्यांनी स्वत: ची सुटका करून घ्यावी. ईडीची कारवाई कायद्यानुसार होत असल्याचेही त्यांनी म्हटले. राऊत निर्दोष असतील तर त्यांची सुटका होईल, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी बाळासाहेबांची शपथ घेऊ नये. बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार आम्हाला असून आम्ही पक्षासाठी ४०वर्ष काम केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले. नोकरी करता-करता नेते होणे सोपं नाही, याची जाणीव आता राऊतांना होईल,असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नादाला लागून संजय राऊतांनी शिवसेनेचं वाटोळं केलं. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका आम्ही अनेकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे मांडली. मात्र राऊत कायम विरोधी भूमिका मांडायचे. काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ किती योग्य आहे हेच ते सातत्यानं ठाकरेंना सांगायचे. त्याचमुळे पक्षात फूट पडली. ४० आमदार, १२ खासदार बाहेर पडले. राऊत यांनी लढावं. त्यांना कोणी अडवलेलं नाही. त्यांची काही चूक नसेल तर ते या प्रकरणातून बाहेर येतील,’ असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.