मुंबई- कालपासून सुरु असलेल्या भाजप सेना आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या आजही पाहायला मिळत आहेत. एमआयएमने आघाडीच्या मुद्द्यावरून राजकारण ढवळून काढलं आणि चर्चा सुरु झाल्या. आज झालेल्या सेनेच्या शिवसंपर्क अभियानात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला चांगलच सुनावलं आहे. तसेच एमआयएमच्या आघाडीच्या कटाला उध्वस्त करण्याचे आवाहनही यावेळी ठाकरे यांनी खासदार आमदारांना केले आहेत. या बैठकीत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊतदेखील उपस्थित होते.
राऊत बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतना सडकून टीका केली. आपलं हिंदुत्व अंगार, मशालीप्रमाणे आहे. आपल्यासमोर जे भंगार लोक हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत त्यांना आपल्या अंगारने संपवून टाका, असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं संजय राऊत म्हणाले.आम्ही १९ जिल्ह्यांमध्ये जाणार आहोत.भाजपाकडून आमच्याविरोधात जे गैरसमज पसरवले जात आहेत, त्यांचा जळफळाट जो बाहेर पडत आहे त्याला उत्तर द्यायचं आहे. आणि खरे जनाबसेनावाल्यांना महाराष्ट्राच्या जनते समोर आणू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तेसच याबद्दलचे सर्व मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी केले , असं संजय राऊतांनी सांगितलं.
कसली जनाबसेना…शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे आणि राहील. शिवसेनच्या हिंदुत्वात कोणतीही भेसळ झालेली नसून, होऊ देणार नाही. आम्हाला जनाबसेना म्हणणाऱ्यांनी आपला इतिहास, भूतकाळातील कर्तबगारी तपासून पहावी, असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला आहे.