यशवंत जाधवांनी २४ महिन्यांत मुंबईतील ३६ इमारती विकत घेतल्या; सोमय्या यांचे आरोप

मुंबई- मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी २४ महिन्यात ३६ इमारतींची खरेदी केली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.  या सगळ्याची केंद्रीय तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी केली जाईल, असेही सोमय्या यांनी म्हंटले आहे.

यशवंत जाधव यांनी मुंबईतील किती जुन्या इमारती विकत घेतल्या आहेत, याची यादी समोर आली तर शिवसेनेचे नेते किती मोठे माफिया आहेत, हे सगळ्यांना कळेल, असे सोमय्या यांनी यापूर्वीच म्हटले होते. मात्र, आता  किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधवांनी नेमक्या किती इमारती विकत घेतल्या याचा आकडा समोर आणला आहे. या माहितीनुसार, यशवंत जाधव आणि यामिनी जाधव या दाम्पत्याने दोन वर्षांच्या कालावधीत मुंबईतील ३६ इमारती विकत घेतल्या आहेत . यामध्ये प्रामुख्याने पगडी चाळी आणि जुन्या इमारतींचा समावेश आहे. यशवंत जाधव यांच्याकडे इतकी संपत्ती असेल तर त्यांच्या नेत्यांकडे किती संपत्ती असेल, असा सवालही किरीट सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

किरीट सोमय्या यांच्या दाव्यानुसार मुंबईतील ३६ इमारतींमध्ये यशवंत जाधव यांच्या मालकीचे तब्बल १००० गाळे आहेत. यामध्ये घरे आणि दुकानांचा समावेश आहे. सक्तवसुली संचलनालय, आयकर विभाग आणि कंपनी विभागाकडून या सगळ्याची चौकशी केली जाईल. यामध्ये तब्बल १००० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला.

Share