औरंगाबादमध्ये चाललय काय? एकाच दिवशी तीन खुनाच्या घटनेने शहर पुन्हा हादरलं !

औरंगाबाद : शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर आता प्रश्न निर्माण होत आहे. कारण एकाच दिवशी जिल्ह्यात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. यातील दोन घटना या शहरात तर एक घटना ग्रामीण मध्ये घडली आहे. सतत खुनाच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादची ओळख आता ‘क्राईम कॅपिटल’ म्हणून होत आहे.

यातील पहिली घटना बेगमपुरा पोलीस ठाणे हद्दीत हिमायतबाग शेजारील शेताजवळ उघडकीस आली. डोंगराच्या पायथ्याला कोणीतरी अज्ञात आरोपीने एका व्यक्तीच्या डोक्यात वार करून हत्या केली आहे. तर पुरावे नष्ट करण्याचे उद्देशाने एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत मृतदेह बांधून पेटवून दिला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह उत्तर तपासणीसाठी पाठवला आहे.

दुसरी घटना ही सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहुलनगरमध्ये घडली आहे. पतीने चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात दगड़ाने वार करत तिची हत्या केली आहे. मीना मच्छिंद्र पिटेकर ( वय ५० रा.राहुल नगर ) असे मयत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. महिलेचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी घाटी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

तर तिसरी घटना ग्रामीणमध्ये घडली आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन येथे सुद्धा एका 65 वर्षे महिलेचा डोक्यात लोखंडी खलबत्ता टाकून हत्या करण्यात आली आहे. महिलेने उधार पैसे देण्यासाठी नकार दिल्याने रात्रीच्या सुमारास तिची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा मयत महिलेच्या मुलाचा वर्गमित्र होता. राजू ईसाक शेख असे आरोपीचे नाव आहे.

शहरात सतत खुनाच्या घटना घडत आहे. यामध्ये नशेच्या आहारी जावून खुनाच्या घटना घडल्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे आता गृहमंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहे.

Share