२०२४ साली जेव्हा आमची सत्ता येईल, तेव्हा या सगळ्यांचा…

नवी दिल्ली : २०२४  साली जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा या सर्वांचा हिशोब होईल. २०१९ ला हिशोब झाला नाही. तो २०२४ ला होईल. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. त्याबद्दल माझ्यावर काय कारवाई करायची ती आता करा, असं आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. ते नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षात माणसं येत असतात, जात असतात. काँग्रेस पक्षातूनही माणसं गेली आहेत, कधी काळी भाजपातूनही निघून गेली. तरी, आज सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारी भारत जोडो यात्रा निघाली आहे. ना, असा सवाल राऊत यांनी केला. तसेच, पक्ष कधीही संपत नसतो, असेही ते म्हणाले. काही स्वार्थी आणि बेईमान लोकं सोडून गेले म्हणजे पक्ष संपला असं नाही, हे बेईमान कोणाचेच नसतात. जे शिवसेनेला आई म्हणायचे, त्या शिवसेनेचे झाले नाहीत, ते इतरांचे काय होणार, अशा शब्दात संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना नेत्यांवर प्रहार केला.

तसेच, २०२४ मध्ये जेव्हा आमची सत्ता येईल, तेव्हा या सगळ्यांचा हिशोब केला जाईल, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.मी हे विधान करत आहे, त्याबद्दल माझ्यावर जी काही कारवाई करायची आहे ती करा. पण, महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, तेव्हा पाहू, असेही राऊत यांनी म्हटले.

Share