ईडी कारवाईची माहिती आधीच देणाऱ्या भाजप नेत्यांवर कधी कारवाई होणार? सुप्रिया सुळे

मुंबईः  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकयांच्यावर काल ईडीने कारवाई केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध केला. त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी ईडीची कुठलीही कारवाई होते तेव्हा महिन्याअगोदरच त्या कारवाईसंबंधीची माहिती बाहेर कशी येते? दहावीचा एखादा पेपर फुटला की परीक्षा रद्द होते. शिक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. मग ईडी कारवाईची माहिती बाहेर येतात तेव्हा ईडीचा पेपर फुटल्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

 

सुप्रिया सुळे म्हणाल्य की, ईडीची माहिती भाजपच्या नेत्यांना कशा मिळतात याची चौकशी व्हावी, अशी मागणीही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले. कोणताही व्यक्ती एकदा मंत्री झाला की तो पक्षाचा न राहता देशाचा मंत्री होतो. अमित शाह हे देशाचे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे एक महिला म्हणून मी न्याय मागणार आहे, असे त्या म्हणाल्या.

विरोधी पक्षातील काही लोक बिनबुडाचे आरोप करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भाजपची पोलखोल बऱ्याच काळापासून नवाब मलिक करत आले आहेत. त्यामुळे त्यांना सतत धमक्या मिळत होत्या. जेव्हा नवाब मलिक धमक्यांना जुमानत नाहीत असे दिसायला लागले तेव्हा त्यांच्यावर खोट्या आरोपांची राळ उठविण्यात आली, असे सुळे म्हणाल्या.

आमचे सरकार दडपशाहीचे सरकार नाही. विरोधकांनी विरोध करत राहावा त्यांचा तो अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकारला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ती आम्ही करत राहणार. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना आम्ही फार गांभीर्याने घेत नाही, असे सुळे म्हणाल्या.

Share