फडणवीसांनी आरोप केलेले सरकारी वकील चव्हाण कोण आहेत ?

मुंबई- राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी विधानसभेत महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत अध्यक्षांना पुराव्यानिशी पेन ड्राईव्ह सादर केला होता. त्यावरून राज्यात एकच खळबळ उडाली होती. पुढे ते म्हणाले की , हा  महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना आहे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत आहेत, असे आरोप फडणवीस यांनी केले आहेत .

हा आरोप करताना त्यांनी १२५ तासांच्या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ रेकाॅर्डींग  विधानसभेत जमा केले आहे. सुमारे १२५ तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग २९ वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून फडणवीस यानी सादर केला. भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटं कट रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात असल्याचा दावा, फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीसांच्या या आरोपांनंतर प्रवीण चव्हाण हे नाव चर्चेत आलं. कोण आहेत हे प्रवीण चव्हाण असा प्रश्न विचारला जाऊ लागला.

कोण आहेत प्रविण चव्हाण- 

प्रवीण पंडित चव्हाण हे विशेष सरकारी वकील आहेत. सुरेशदादा जैन, रमेश कदम, डीएसके, महेश मोतेवार, बीएचआर बँक, रवींद्र बराटे यांच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे.  माजी मंत्री गिरीश महाजन प्रकरणातही त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे. जळगावची नूतन मराठा विद्या प्रसारक संस्थेपासून या वादाला सुरुवात झाली. साधारण चार वर्षांपूर्वी या संस्थेत सत्ता मिळवण्यासाठी दोन गटांमध्ये स्पर्धा सुरू होती. पहिला नरेंद्र पाटील गट आणि दुसरा भोईटे गट. ही संस्था हडप करण्यासाठी गिरीश महाजन यांनी भोईटे गटाला साथ दिली आणि बनावट पद्धतीने संस्था बळकावली असा पाटील गटाचा आरोप आहे.

नरेंद्र पाटील यांचे लहान भाऊ अॅड.विजय पाटील यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. आपले अपहरण आणि मारहाण झाल्याचा त्यांचा आरोप आहे. तसंच चाकूचा धाक दाखवून संस्थेतून राजीनामा द्यायला सांगितलं असाही त्यांचा आरोप आहे. याच प्रकरणात प्रवीण चव्हाण हे सरकारी वकील म्हणून काम पाहात होते. सादर केलेल्या व्हीडिओमध्ये प्रवीण पंडित चव्हाण हे चाकू प्लांट करण्यापासून ड्रग्जचा धंदा कसा करायचा, रेड कशी टाकायची, रेडमध्ये वस्तू कशा प्लँट करायच्या आणि कसेही करून ही केस मोक्कामध्ये कशी फिट बसवायची याचं नियोजन करत असल्याचं फडणवीसांनी त्यांच्या आरोपात म्हटलं होतं.

Share