नवी दिल्लीः राष्ट्रपती पदासाठी १८ जुलै (सोमवारी) पार पडलेल्या निवडणूकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणूकीत भाजपकडून उभ्या असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय होणार की विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची वर्णी राष्ट्रपती पदी पदासाठी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज देशाला कोण नवीन राष्ट्रपती मिळणार हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
द्रौपदी मुर्मू विजयी झाल्यास देशाला दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळतील तर पहिल्या आदिवासी समाजाच्या नेत्या २५ तारखेला राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च पदावर विराजमान होतील. प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता. देशाचे १५ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मूळच्या ओदिशाच्या असलेल्या मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला तर आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती होणार आहेत. आपल्या निवडीमुळे आदिवासी समाजाला आनंदच होईल, अशा प्रतिक्रिया द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा असल्याने त्यांच विजयी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून मुर्मू यांना ७० टक्क्यांहून अधिक मतं मिळतील असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुर्मू यांना किती मतं मिळतात हे पाहणं औचुक्याच ठरणार आहे.
मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, वायएसआर काँग्रेस, जनता दल धर्मनिरपेक्ष, अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, बसप, तेलुगू देसम या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. विरोधी आघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेने आदिवासी समाजातील उमेदवार या मुद्द्यांवर भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. परिणामी यशवंत सिन्हा यांच्या मतांचे मूल्य कमी झालं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पार्टी, द्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती आदींनी सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान १० लाख, ८६ हजार, ४३१ एकूण मत मूल्यांपैकी मुर्मू यांना साडे सहा लाखांपेक्षा अधिक मतमूल्य मिळेल असा दावा भाजप ने केला आहे.त्यामुळे आज या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.