अहमदाबाद : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज रविवारी (२९ मे) रात्री ८ वाजता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामातील ही अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून, त्यात कोणता संघ बाजी मारणार याकडे तमाम क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. १५ वर्षांपूर्वी आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी आहे, तर दुसऱ्या बाजूला दिग्गजांचा पराभव करत प्रथमच लीगमध्ये खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला नवा इतिहास घडवण्याची संधी आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स या दोन संघांनी यंदाच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. हे दोन्ही तुल्यबळ संघ आयपीएल क्रिकेटच्या अंतिम लढतीत प्रथमच आमने-सामने येणार असून, दोन्ही संघांचा इतिहास घडवण्याचा मानस आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने १० सामने जिंकून २० गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले, तर राजस्थान रॉयल्स संघ ९ सामने जिंकून १८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता हे दोन संघ पुन्हा एकदा आयपीएलच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी हे दोघेही प्लेऑफ सामन्यात आमनेसामने आले होते, ज्यामध्ये गुजरातने राजस्थानचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता.
आयपीएलच्या १५ व्या हंगामाच्या अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला २० कोटी तर उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये मिळतील. याशिवाय पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपये बक्षीस रक्कम दिली जाईल. तसेच उदयोन्मुख खेळाडूला २० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी स्पर्धेचा सांगता सोहळा होणार असून, त्यात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकाच संघाला पदार्पणात जेतेपदाला गवसणी घालण्यात यश आले आहे. हा संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघाने २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात ही कामगिरी केली होती. त्यानंतर राजस्थानला अंतिम फेरीचा टप्पाही गाठता आला नाही. यंदा मात्र संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी १४ पैकी ९ साखळी सामने जिंकले. त्यानंतर त्यांना ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात गुजरातने पराभूत केले; परंतु त्यानंतर त्यांना ‘क्वॉलिफायर-२’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (आरसीबी) वर मात करण्यात यश आले. आता अंतिम सामन्यात त्यांचा १४ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल. त्या दृष्टीनेच राजस्थान रॉयल्सचा संघ मैदानात उतरेल.
राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला विक्रमाची संधी
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर सध्या भलताच फॉर्मात आहे. यंदा आयपीएलच्या मोसमात या इंग्लंड फलंदाजाने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे. जोस बटलरने आयपीएल २०२२ मध्ये ४ शतके झळकावली आहेत आणि एका मोसमात सर्वाधिक शतके करण्याच्या विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बटलरने यंदाच्या हंगामात १६ सामन्यांत १५१ च्या स्ट्राईक रेटने चार शतकांसह तब्बल ८२४ धावा केल्या आहेत. त्याने प्ले ऑफमध्येच १९५ धावा केल्या आहेत. त्यामुळे आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत अग्रस्थानावर असलेल्या विराट कोहलीला (२०१६ च्या हंगामात ९७३ धावा) मागे टाकण्याची बटलरला संधी मिळेल.
युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, कृष्णा, ट्रेंट बोल्टची जादू चालणार का?
फिरकीपटू युझवेंद्र चहलचा राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२२ च्या अंतिम फेरीत पोहोचण्यात मोठा वाटा आहे. चालू हंगामात १६ सामन्यात २६ विकेट्स घेऊन सर्वाधिक बळी घेणारा हसरंगा नंतरचा तो दुसरा गोलंदाज आहे. प्ले ऑफमध्ये चहलची जादू चालली नाही आणि या काळात तो एकही विकेट घेऊ शकला नाही व तो महागडाही ठरला आहे; पण लीग टप्प्यात त्याने आपली भूमिका चोख बजावली. यंदा सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये राजस्थानचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल (१६ सामन्यांत २६ बळी) संयुक्तरीत्या अग्रस्थानावर आहे. अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने १६ सामन्यांत १२ बळी मिळवले आहेत. तसेच प्रसिध कृष्णा (१६ सामन्यांत १८ बळी), ट्रेंट बोल्ट (१५ सामन्यांत १५ बळी) आणि ओबेड मकॉय (६ सामन्यांत ११ बळी) या वेगवान त्रिकुटाच्या कामगिरीचा आलेख सामन्यागणिक उंचावल्याचे पाहायला मिळाले आहे.
यंदाचा हंगाम शेन वॉर्नला समर्पित
यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी राजस्थानचा माजी कर्णधार शेन वॉर्नचे निधन (४ मार्च) झाले. वॉर्नला ‘पहिला रॉयल’ म्हणून संबोधले जाते. त्यामुळे अंतिम सामन्यात विजय मिळवून वॉर्नला आदरांजली वाहण्याचा राजस्थानच्या संघाचा प्रयत्न आहे. ‘‘यंदाचा हंगाम आम्ही वॉर्नला समर्पित केला आहे. आता आम्ही जेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहोत. आम्हाला त्याच्यासाठी काही तरी खास करायचे आहे,’’ असे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला.
हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, शुभमन गिलवर नजर
अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला हंगामाआधी झालेल्या ‘आयपीएल’ खेळाडू लिलाव प्रक्रियेअंती अनेक क्रिकेट समीक्षक स्पर्धेतील सर्वात दुबळा संघ म्हणून संबोधत होते. हार्दिक पंड्या, रशीद खान, शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि लॉकी फर्ग्युसन यांच्यासारख्या काही अनुभवी खेळाडूंचा अपवाद वगळता इतरांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. डेव्हिड मिलरसारख्या खेळाडूमध्ये आता विजयवीराची भूमिका बजावण्याची क्षमता उरलेली नाही. राहुल तेवतियासारख्या खेळाडूवर अवलंबून राहणे योग्य नसल्याचे म्हटले जात होते. मात्र, या सर्व खेळाडूंनी वेळोवेळी आपली कामगिरी उंचावल्याने गुजरात हा यंदा सर्वाधिक सामने जिंकणारा संघ म्हणून पुढे आला. त्यांनी १४ पैकी १० साखळी सामने जिंकण्याची किमया साधली. गुणतालिकेत अग्रस्थान पटकावल्यानंतर त्यांनी ‘क्वॉलिफायर-१’मध्ये राजस्थानला शह देत अंतिम फेरी गाठली. आता त्यांचे पहिल्याच हंगामात जेतेपद मिळवण्याचे लक्ष्य असेल.
गेल्या काही महिन्यात करिअरमधील चढ-उतार पाहिलेल्या हार्दिक पंड्या आणि आशीष नेहरा यांनी दोन महिन्यात गुजरात संघाला अव्वल स्थानी पोहोचवले. आयपीएलच्या मेगा लिलावानंतर गुजरात संघावर मॅच खेळण्याआधीच पराभव झालेला संघ अशी टीका करण्यात आली होती; परंतु या संघाने मैदानावरील कामगिरीने सर्वांना चोख उत्तर दिले. ‘वन मॅच वंडर’ असे म्हटले जाणाऱ्या राहुल तेवतिया आणि सातत्याने चांगली कामगिरी करणारा डेव्हिड मिलरसारख्या खेळाडूंचा हा संघ कागदावर मजबूत वाटत नव्हता; पण या खेळाडूंनी कमाल करून दाखवली. फॉर्ममध्ये परतलेल्या हार्दिकने कर्णधारपदाचा दबाव न घेता फलंदाजी केली.
राहुल तेवतिया, रशीद खान यांच्यात फटकेबाजीची क्षमता
दुसऱ्या बाजूला पाच वर्षे लय मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या डेव्हिड मिलरने सर्वांना धक्का दिला. राहुल तेवतियानेदेखील चांगली खेळी केली. रशीद खानने त्याच्या भात्यात नवे डावपेच ठेवले आहेत, तर वृद्धिमान साहाने अजून एक हंगाम खेळण्याचे निश्चित केले आहे. यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी गुजरातची फलंदाजी संपूर्ण स्पर्धेत सर्वात कमकुवत मानली जात होती. मात्र, कर्णधार हार्दिक पंड्या (१४ सामन्यांत ४५३ धावा) आणि डावखुरा डेव्हिड मिलर (१५ सामन्यांत ४४९) या अनुभवी जोडीने सातत्यपूर्ण कामगिरी करत गुजरातच्या फलंदाजीला बळकटी दिली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात त्यांच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल. शुभमन गिल (१५ सामन्यांत ४३८) आणि वृद्धिमान साहा (१० सामन्यांत ३१२) या सलामीवीरांनी गुजरातला बहुतांश सामन्यांमध्ये उत्तम सुरुवात करून दिली आहे. तसेच अखेरच्या षटकांमध्ये राहुल तेवतिया आणि रशीद खान यांच्यात फटकेबाजीची क्षमता आहे. आजच्या अंतिम सामन्यात घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा गुजरातला होऊ शकतो.
सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप)
१) जोस बटलर ८२५
२) केएल राहुल ६१६
३) क्विंटन डीकॉक ५०८
४) फॅफ ड्यूप्लेसिस ४६८
५) शिखर धवन ४६०
सर्वाधिक बळी (पर्पल कॅप)
१) वानिंदू हसरंगा २६
२) युझवेंद्र चहल २६
३) कॅगिसो रबाडा २३
४) उमरान मलिक २२
५) कुलदीप यादव २१