मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का ?

लातुर : बाॅम्बहल्ले करुन शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या मंत्री नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान असून मुख्यमंत्री उद्वव ठाकरे राष्ट्रवादी काॅँग्रेसच्या दबावापुढे न झुकता नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन ठाकरी बाणा दाखवणार का ? असा सवाल माजी मंत्री संभाजी पाटील संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, यांनी  पत्रकार परिषदेत केला .
मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून देशद्राही दाऊदच्या हस्तकास अभय देण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल. १९९२-९३ च्या बॉम्बस्फोटात दाऊदच्या हल्ल्यापासून मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आज मात्र मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या हव्यासापोटी दहशतवादी दाऊदच्या हस्तकास वाचविण्याचा घातक खेळ करत आहे. ठाकरे यांच्या नाकर्तेपणामूळे संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

याआधी भर विधिमंडळात भ्रष्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे याची पाठराखण केली होती. त्यानंतर खंडणीखोर अनिल देशमुख यांनाही पाठीशी घालण्याचे आटोकाट प्रयत्न केले. केवळ सत्ता टिकविण्यासाठी भ्रष्ट, व्यभिचारी आणि खंडणीखोर सहकाऱ्यांना वाचविताना ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या ठाकरी बाण्यास मूठमाती दिली. आता मतांच्या राजकारणासाठी देशद्रोही कारवायांतील सहभागाचा आरोप असलेल्या नवाब मलिक या मंत्र्याकरिता आपला कणा झिजविण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे. स्वतःची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे अनुयायी असलेल्या कडवट शिवसैनिकांच्या भावनांची थट्टा चालविली आहे.
Share