आ.बोरनारे यांच्या अडचणीत वाढ, आयजींनी दिले चौकशीचे आदेश

औरंगाबाद-   भाजपच्या कार्यक्रमाला का गेली, अशी विचारणा करीत भावजयीला मारहाण केल्याच्या प्रकरणात वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या अडचणीत वाढ होत आहे. या प्रकरणात आता विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना यांनी स्वतः लक्ष घालून आ. बोरनारे यांची चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक निमित गोयल यांना दिले आहेत. दरम्यान, प्रसन्ना यांनी पत्रकारांशी बोलताना कायदा सर्वासाठी समान असतो असे सूचक वक्तव्य केल्याने आ. बोरनारे यांच्यावरील आरोप सत्य असल्याचे मानले जात आहे.

गेल्या आठवड्यात १८ फेब्रुवारीला आ. बोरनारे यांच्यासह १० जणांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार आ. बोरनारे यांची चुलत भावजय जयश्री दिलीप बोरनारे यांनी पोलिसांत दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी किरकोळ कलमान्वये गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. दुसरीकडे, दुसऱ्याच दिवशी एकाच्या तक्रारीवरून जयश्री बोरनारे यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्य महिला आयोगाने आ. बोरनारे यांनी भावजयीला भररस्त्यात केलेल्या मारहाणीची दखल घेऊन वैजापूर पोलिसांकडे तीन दिवसात अहवाल मागितला होता. त्याबाबत काय झाले हे अद्याप गुलदस्त्यात असताना आत विशेष पोलिस महानिरीक्षकांनी थेट या प्रकरणात लक्ष घालून आ. बोरनारे यांच्या चौकशीचे आदेश दिल्याने आ. बोरनारे यांच्यासह वैजापूरचे पोलिस अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काल या प्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना यांची भेट घेतली. जयश्री बोरनारे यांना केलेल्या मारहाणप्रकरणी आ. बोरनारे यांच्यासह सर्व दहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, जयश्री बोरनारे यांच्याविरोधातील ऍट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी डॉ. कराड यांनी केली आहे.

Share