आता भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला जोडे मारणार की राज्यपालांना?

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर सडकून टिका केली आहे.

प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा अत्यंत दळभद्री विधान केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला.  त्याचवेळी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आहेत, त्यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पाचवेळा औरंगजेबाची माफी मागितली असं विधान केलं आहे, हे प्रसारमाध्यमांच्या नजरेतून का सुटतं आहे मला कळत नाही? ही भाजपाची अधिकृत भूमिका आहे का? की वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करायचा. संभाजी राजांचा अपमान करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळी कधी माफी मागितली. हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर केलं पाहिजे. कारण ते भाजपाचे आता सहयोगी आहेत, ते मुख्यमंत्री आहेत.

याशिवाय, वीर सावरकरांबाबत आपण रस्त्यावर उतरलात स्वागत आहे. जोडे मारले स्वागत आहेत. आता हे जोडे तुम्ही कोणाला मारणार आहात? भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला मारणार आहात की राज्यपालांना मारणार आहात? ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अशाप्रकारे घोर अपमान केला. असंही संजय राऊत म्हणाले.

राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले?
तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले. औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

Share