महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय – संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यांवरून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. यावरच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपासह राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत माध्यामांशी बोलतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा अत्यंत दळभद्री विधान केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला.  त्याचवेळी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आहेत, त्यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पाचवेळा औरंगजेबाची माफी मागितली असं विधान केलं आहे, हे प्रसारमाध्यमांच्या नजरेतून का सुटतं आहे मला कळत नाही? ही भाजपाची अधिकृत भूमिका आहे का? की वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करायचा. संभाजी राजांचा अपमान करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळी कधी माफी मागितली. हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर केलं पाहिजे. कारण ते भाजपाचे आता सहयोगी आहेत, ते मुख्यमंत्री आहेत.

याशिवाय, ‘छत्रपतींनी माफी मागितली तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत जयजयकार का करतात? नौसेनेचे बोधचिन्ह दिलंय तर ते का दिलं आहे? औरंगजेब आणि अफजल खानाच्या कबरी फोडण्याची नाटकं का करत आहात तुम्ही? स्वाभिमानाचे तुणतुणे वाजवत भाजपबरोबर गेलात ना? आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? मुख्यमंत्री आणि ४० आमदार साधा निषेधही व्यक्त करु शकले नाहीत. भाजपनं छत्रपतींचा अपमान केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता. आम्ही मविआत गेलो आणि स्वाभिमान दुखावला म्हणून तुम्ही भाजप बरोबर गेलेत ना? इथे अधिकृतपणे भाजपनं आणि राज्यपालांनी अपमान केला आहे,’ असा हल्लाबोल करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Share