नागपुर : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात विशेषत: महापुरूषांचा अपमान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्याबाहेर गेलेले प्रकल्प, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यावरून विरोधक सत्ताधााऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
राज्य विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती, राष्ट्रपुरुषांच्या अवमान आदी मुद्दय़ांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
महविकास आघाडीच्या आमदारांची बैठक
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी १० आणि दुपारी ४ वाजता ही बैठक होईल. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात २३ विधेयक मांडणार
सरकारकडून २३ विधेयके प्रस्तावित आहेत. तर ५ अध्यादेश देखील पटलावर ठेवण्यात येणार आहेत. २३ अध्यादेशांपैकी मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त १२ विधेयकं आहेत तर मंत्रिमंडळ मान्यता सापेक्ष ११ विधेयकं आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, २०२२ मान्यतेसाठी मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते.