मविआच्या महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी, कारण…

मुंबई : महापुरूषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडी आणि घटक पक्षांकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला सुरवात झाली असून या मोर्चात अजित पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीमधील जवळपास सर्वच नेते सहभागी होणार आहेत. मात्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे या महामोर्चात सहभागी होणार नाहीत. यावरून आता राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.

अशोक चव्हाण यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार सौ. अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील.कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी.

 

दरम्यान, महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अशोक चव्हाण दांडी मारणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे अशोक चव्हाण पक्षातच नाराज असल्याचे मागील काही दिवसांपासून बोललं जात होतं.काही महिन्यांपासून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. आता पुन्हा अशोक चव्हाणांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसत आहे.

Share