एकनाथ शिंदे जागे व्हा! तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही – अमोल मिटकरी

नागपुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले असून आता त्यांची जागा देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यावर राष्ट्रवादी काॅँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

अमोल मिटकरी आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात, एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, दस्तुर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे, अर्थ साधा सोपा तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही ! जागे व्हा !!, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

 

 

काय म्हणाले होते बावनकुळे?
श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा आणि श्री संताजी आर्ट गॅलरीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नंदनवनमधील जगनाडे चौकात पार पडले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाबद्दल इच्छा बोलून दाखवली.

सर्वच समाजाला न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्राचं सर्वोच मुख्यमंत्रिपद मिळालं पाहिजे अशी जबाबदारी आपल्यावर आहे, पुढील काळात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना बसलेलं पाहायचं असेल, तर आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची वेळ आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

महाराष्ट्रातील १८ पगड जातीचं ओबीसी आरक्षण गेलं होतं, ते परत मिळवून देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी करून दिलं. संताजी सभागृहाला जागा देणं, निधी देणं. संताजी महाराजांचा संपूर्ण इतिहास मांडला जाईल, त्यातून समाजाला दिशा मिळेल, असंही बावनकुळे म्हणाले.

Share