‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरुन संभाजी भिडेंना महिला आयोगाची नोटीस

मुंबई : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते संभाजी भिडे हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. काल संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी  मंत्रालयात आले होते. संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली, पण या भेटीनंतर महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं.

महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडे म्हणाले, ‘आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला दिली आणि ते निघून गेले.

 

दरम्यान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना नोटीस देत म्हटलं आहे की, महिला पत्रकाराला तु टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे.  याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यांनी आज केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा, असं महिला आयोगानं म्हटलं आहे.

Share