आज जागतिक जल दिन, भविष्यात पाण्यासाठी होऊ शकते तिसरे महायुध्द

आपल्या जीवनात पाण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. पाण्याशिवाय पृथ्वीवरील प्राणी जीवन ही कल्पना ही आपण करू शकत नाही. एक काळ आपल्याकडे असा होता की नद्या, तलाव, कालवे, विहिरी जागोजागी पाहायला मिळत होत्या. परंतु औद्योगिकीकरणामुळे मोठे बदल झाले आणि जागोजागी दिसणारे कालवे, विहिरी गायब झाल्या. नद्यांचे पाणीही प्रदूषित होत आहे. जगभरातील लोकांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आणि लोकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी दरवर्षी २२ मार्च हा जागतिक जल दिवस म्हणून साजरा केला जातो.

पाणी हेच जीवन आहे पाण्याशिवाय सजीवसृष्टी याची कल्पानाही करता येणार नाही. हे सर्व असतानाही ३० वर्षापासून पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी हा जागतिक जल दिन साजरा केला जात आहे. काळाच्या ओघात जलस्त्रोत बदलले असले तरी पाण्याचा अपव्यय हा सुरुच आहे. त्यामुळेच २१ व्या शतकातही पाण्याचे संकट हे सर्वांसमोरच आहे. पाण्यासंबंधीच्या आव्हानावर मात करण्यासाठी निसर्गाचा कसा उपयोग करुन घेता येईल याची संकल्पना या जागतिक जल दिनाच्या निमित्ताने सर्वांसमोर मांडली जाते.

जगातील पाण्याची कमतरता लक्षात घेत अंदाजे ३२ वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली गेली होती की, जर लोकांना वेळीच पाण्याचे महत्त्व कळले नाही तर पुढील महायुद्ध पाण्यासाठी होईल. असे म्हटले जाते की ही भविष्यवाणी संयुक्त राष्ट्राच्या सहाव्या सरचिटणीस, बुतरस घाली यांनी केली होती. एका भाषण दरम्यान, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जनतेला इशारा दिला होता की, आग पाण्यासाठी देखील लागू शकते. पुढचे महायुद्ध पाण्याच्या प्रश्नावरूनही होऊ शकते.

Share