औरंगाबाद ; शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील युनिव्हर्सल हायस्कुलवर कारवाई करत जिल्हा परिषदेचे शिक्षणअधिकारी मधुकर देशमुख यांनी या शाळेला काळ्या यादीत टाकले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि अन्य साहित्य शाळेमार्फत खरेदी करण्याची सक्ती करत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबचे पत्र मुख्याध्यापकांना पाठवण्यात आले आहे.
युनिव्हर्सल शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी २२ डिसेंबर २०२१ मध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षांकडे अर्ज केला होता. यात शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि अन्य साहित्य शाळेमार्फत खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचे कळविण्यात आले होते. समितीने १० जानेवारी २०२२ रोजी दिलेल्या निर्णयात, शाळा तसे करीत असल्यास त्यापासून परावृत्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते. शिक्षण विस्तार अधिकारी यांनी ११ मार्च २०२२ रोजी शाळेला भेट देऊन विविध प्रकारची माहिती सादर करण्याचे कळविले होते. प्रतिसाद न मिळाल्याने ३१ मार्चला खुलासा मागवला होता. त्यासही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या भेटीत तक्रारदार पालकांनी शुल्क विवरण पत्र तसेच शाळेचा लोगो असलेली स्कुल बॅग, वह्या, इत्यादी साहित्य कार्यालयाच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आणून दिले.
विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी शिक्षणाधिकारी यांना १० जून २०२२ ला कारवाईबाबत पत्र पाठवले. यात शाळेचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे कळविले होते. त्यानुसार शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मधुकर देशमुख यांनी आपली शाळा काळ्या यादीत टाकत आहे, असे पत्र युनिव्हर्सल हायस्कुलच्या मुख्याध्यापकांना पाठविले आहे.