संत तुकाराम व ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या बांधकामासाठी ११ हजार कोटींचा निधी : पंतप्रधान मोदी

पुणे : काही महिन्यांपूर्वी पालखी मार्गावरील दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदीकरणाचे भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली. जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम पाच टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. या पूर्ण प्रकल्पात ३५० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासाठी ११ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. यामुळे या भागाच्या विकासालादेखील गती मिळेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीक्षेत्र देहू येथे केली.

पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण आज मंगळवारी (१४ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रम ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीनदादा मोरे, आळंदी देवस्थानचे योगेश देसाई, पंढरपूर देवस्थानचे उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मारुतीबाबा कुरेकर, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले आदी उपस्थित होते. प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुकाराम महाराज यांची पगडी, उपरणं आणि तुळशीचा हार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोदींनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, विठ्ठल-रुख्मिणी यांचे दर्शन घेतले. लोकार्पण सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

शिळा मंदिर हे भक्ती-शक्तीचे केंद्र नव्हे तर भारताचे सांस्कृतिक भविष्य घडवणारे मंदिर

श्री विठ्ठलाय नम: असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. देहू येथील ज्या शिळेवर स्वतः संत तुकाराम महाराजांनी १३ दिवस तपस्या केली, जी शिळा तुकाराम महाराजांच्या वैराग्याची साक्षीदार होती, ती शिळा नाही तर भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा आहे. संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर हे केवळ भक्ती-शक्तीचे केंद्र नव्हे तर भारताचे सांस्कृतिक भविष्य घडवणारे मंदिर आहे. हे शिळा मंदिर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो. संत तुकाराम महाराजांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, भगवान श्री विठ्ठल आणि सर्व वारकऱ्यांच्या चरणावर माझे कोटी कोटी वंदन.

आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे, मनुष्य जन्मात सर्वात दुर्लभ संतांचा सत्संग आहे. संतांची कृपा झाली, तर ईश्वराची अनुभती आपोआप होते. आज देहूच्या या पवित्र, तीर्थ भूमीवर मला येण्याचे भाग्य लाभले आणि मीदेखील इथे तीच अनुभती घेत आहे. संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. देहू संतशिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आहे, कर्मस्थळदेखील आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव. तेथे नांदे देव पांडुरंग, धन्य क्षेत्रवासी लोक ते देवाचे. उच्चारीती वाचे नामघोष. देहूमध्ये पांडुरंगाचा नित्य निवासदेखील आहे आणि इथला प्रत्येकजण स्वत:देखील भक्तीने ओतप्रोत असा संतस्वरुपच आहे. या भावनेने मी देहूतील सर्व नागरिकांना माझ्या माता-भगिनींना आदरपूर्वक नमन करतो.

शिवाजी महाराजांच्या जीवनात संत तुकाराम महाराजांचा मोलाचा वाटा

पंढरपुरातील पालखी मार्गाप्रमाणे चारधाम मार्ग, सोमनाथ मंदिर आणि अयोध्येतील राममंदिराचे कामही वेगाने सुरु आहे, अशी माहिती देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले, देहूच्या परिसरात भगवान पांडुरंग सापडतो. येथील प्रत्येकजण भक्तीने ओतप्रोत संताचे रुप आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव, तसेच मुक्ताबाई या संतांच्या समाधीचे ७२५ वे वर्ष आहे. या महान व्यक्तींनी आपल्या शास्वततेला सुरक्षित केले असून, भारताला गतीशील ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्यलढ्यात शिक्षा झाली तेव्हा ते तुरुंगात संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणत, चिपळीसारखे हातकडी वाजवत असत. संत तुकाराम महाराजांचा दयाळूपणा, करुणा आणि सेवेची जाणीव त्यांच्या ‘अभंगां’च्या रूपात अजूनही आहे. तुकोबारायांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जे नष्ट होत नाही, जे शाश्वत राहते आणि काळाबरोबर संबंधित असते, ते अखंड असते. तुकोबारायांचे अभंग हे शाश्वत आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

भारत शाश्वत आहे, कारण भारत ही संतांची भूमी आहे
सध्या भारत देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. जगातील सर्वात जुन्या जिवंत संस्कृतींपैकी भारत एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारताच्या संत परंपरेला, भारतातील ऋषीमुनींना आहे. भारत शाश्वत आहे, कारण भारत ही संतांची भूमी आहे. प्रत्येक युगात आपल्या देशाला आणि समाजाला दिशा देण्यासाठी कुठला ना कोणता तरी महान आत्मा अवतरत आला आहे. आज देशभर संत कबीरदासांची जयंती साजरी होत आहे. आपली राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आज आपली आहे. म्हणूनच, आज जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा हे भारताच्या विकासाचे समानार्थी शब्द बनत आहेत, तेव्हा विकास आणि वारसा दोन्ही हातात हात घालून चालतील याची मी खात्री देतो, असे पंतप्रधानांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, यादव साम्राज्य संपल्यानंतर समाज छिन्नविछिन्न झाला होता, अंधश्रद्धा वाढीला लागली होती. कर्मकांड, बुवाबाजीचे स्तोम माजले होते. शोषण सुरू होते. त्यावेळी भागवत धर्माची पताका हाती घेऊन महाराष्ट्रातील संतांनी समाजाला जागृत करण्याचे काम केले. ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला. त्याचा कळस तुकाराम महाराज झाले. सश्रद्ध पण अंधश्रद्धेपासून दूर असलेला समाज संत तुकाराम महाराजांनी निर्माण केला. वारकर्‍यांचा धर्म काय आहे? ‘सबका साथ-सबका विकास, सबका विश्वास-सबका प्रयास!’ वारकर्‍यांच्याच या ब्रिदावर आज देशाची वाटचाल सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आज वारकर्‍यांच्या भूमिकेतूनच काम करीत आहेत.

 

Share