नवी दिल्ली : दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी (टेरर फंडिंग) जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख आणि फुटीरतावादी नेता यासीन मलिक याला राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) न्यायालयाने जन्मठेप आणि १० लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. आर्थिक दंड न भरल्यास त्याच्या शिक्षेत वाढ होणार आहे. विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी हा निकाल सुनावला.
राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने १९ मे रोजी यासीन मलिक याला बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (UAPA) सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवले होते. आज सुनावणी सुरू होताच एनआयएने यासीन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाच्या या निकालानंतर यासीन मलिकची रवानगी दिल्लीतील तिहार जेलमध्ये होणार आहे. सर्व पक्षांचा शेवटचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय दुपारी साडेतीन वाजेपर्यंत राखीव ठेवला होता. अखेर न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पटियाला हाऊस कोर्टात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पटियाला कोर्टाबाहेर सीएपीएफ आणि विशेष दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.
यासीन मलिकने कोर्टातील सुनावणीदरम्यानं काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असल्याचे आणि त्याच्यावरील सर्व आरोप मान्य केले होते. विशेष म्हणजे यासीन मलिकने या संपूर्ण प्रकरणात वकील घेण्यास नकार दिला होता. मलिकवर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, इतर बेकायदेशीर कारवाया आणि काश्मीरमधील शांतता भंग केल्याचा आरोप होता. १० मे रोजी मलिकने दिल्ली न्यायालयासमोर आपले आरोप कबूल केले होते.जम्मू काश्मीरमधील दहशतवादी आणि बेकायदेशीर कारवायांसाठी पैसे जमवण्यासाठी जगभरात एक नेटवर्कची निर्मिती यासिन मलिकनं केली होती. एनआयएने ३० मे २०१७ मध्ये एक केस दाखल केली होती. या प्रकरणी १८ जानेवारी २०१८ रोजी चार्जशीट दाखल करण्यात आली होती.
Terror funding case | NIA Court in Delhi awards life imprisonment to Yasin Malik. pic.twitter.com/mxwH3dhWLc
— ANI (@ANI) May 25, 2022
एनआयएने कोर्टात लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिदीन, जेकेएलएफ, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानातील आयएसआयच्या समर्थनासह काश्मीरमध्ये दहशतवादी घटना घडवण्यात आल्याची माहिती दिली आहे. यासीन मलिकने १९९० मध्ये दहशतवाद्यांसोबत मिळून वायूसेनेच्या अधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर काही जण जखमी झाले होते. त्यामध्ये स्कवाड्रन लीडर रवी खन्ना यांचा देखील समावेश होता. रवी खन्ना यांच्या शरीरात २८ गोळ्यांचे निशाण आढळून आले होते.
कोणत्या गुन्ह्यांखाली शिक्षा सुनावण्यात आली?
यासीन मलिकवर आयपीसी आणि युएपीए कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत. यांपैकी आयपीसी कलम १२० ‘ब’ अंतर्गत १० वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड, आयपीसी कलम १२१ अंतर्गत जन्मठेप, आयपीसी कलम १२१ ‘अ’ अंतर्गत १० वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड, युएपीए कलम १८ अंतर्गत १० वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड, युएपीए कलम २० अंतर्गत १० वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड, युएपीए कलम ३८, ३९ अंतर्गत ५ वर्षांचा तुरुंगवास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा एनआयए न्यायालयाने यासीन मलिकला सुनावली आहे.
या काश्मीर फुटीरवादी नेत्यांवरही आरोप
१० मे रोजी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने फारुख अहमद दार ऊर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद यांना अटक केली होती. जहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह इतर काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
श्रीनगरमध्ये मलिकच्या समर्थकांकडून जाळपोळ
Shots outside Yasin malik Srinagar residence#YasinMalik #YaseenMalik #Yasin_Malik pic.twitter.com/848wRhXeIa
— Vivek Bajpai (@vivekbajpai84) May 25, 2022
दरम्यान, यासीन मलिकच्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर बंदची हाक देण्यात आली असून, आज शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. श्रीनगरच्या प्रमुख लाल चौकात मलिकच्या समर्थकांकडून जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलिस आणि लष्कराला पाचारण करण्यात आले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला पोटदुखी
Shots outside Yasin malik Srinagar residence#YasinMalik #YaseenMalik #Yasin_Malik pic.twitter.com/848wRhXeIa
— Vivek Bajpai (@vivekbajpai84) May 25, 2022
एनआयए कोर्टाने आज यासीन मलिकला टेरर फंडिंग केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेप आणि आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, या निर्णयामुळे तिकडे पाकिस्तानातील अनेक सेलिब्रिटींच्या पोटात दुखू लागले आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने याबाबत ट्विट करून नाराजी व्यक्त केली. शाहिद आफ्रिदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, ‘भारतात सुरू असलेल्या मानवी अधिकारांचे दमन विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम सातत्याने सुरू आहे. यासीन मलिकविरूद्ध खोटे आरोप लावून काश्मीरचा स्वातंत्र्याबद्दलचा संघर्ष थांबणार नाही. मी विनंती करतो की, युएनने काश्मिरी नेत्यांविरूद्ध सुरू असलेल्या खोट्या अन्यायकारक कायदेशीर खटल्यांची दखल घ्यावी.’