सिंहगडावर ट्रेकिंगदरम्यान दरड कोसळून तरुण गिर्यारोहकाचा मृत्यू

पुणे : पुण्याजवळील सिंहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका ३१ वर्षीय तरुण गिर्यारोहकाचा मृत्यू
झाल्याची घटना काल शनिवारी घडली. सिंहगडावरील कल्याण दरवाजाच्या बुरुजाजवळील दरड कोसळण्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली होती. यामध्ये एका प्रशिक्षित गिर्यारोहकाचा दगडांच्या ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. हेमंत धीरज गाला (वय ३१ वर्षे, रा. मित्रमंडळ चौक, पुणे) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या गिर्यारोहकाचे नाव आहे.

शनिवारी (२५ जून) सकाळी ‘सिंहगड एपिक ट्रेक’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे तीनशे स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. कल्याण गावाच्या बाजूने सर्व स्पर्धक पायवाटेने गडावर येत होते. त्यांना मार्ग दाखविण्यासाठी जागोजागी स्वयंसेवक उभे होते. दाट धुके असल्याने आजूबाजूला काही दिसत नव्हते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सिंहगडाच्या कल्याण दरवाजाच्या खालच्या बाजूला डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यावेळी पायवाटेने वर येत असलेल्या हेमंत गाला याच्या अंगावर मोठ-मोठे दगड आले व त्याबरोबर तो खोल दरीत फेकला गेला. खाली काही अंतरावर या दगड, मातीच्या ढिगाऱ्याखाली तो गाडला गेला.

ट्रेकची वेळ संपली तरी हेमंत गाला ह घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी फोन केला; परंतु संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांनी ट्रेक सुरू झाला त्या ठिकाणी आतकरवाडी येथे जाऊन पाहिले असता हेमंतची गाडी आढळून आली. त्यांनी ट्रेकच्या आयोजकांशी संपर्क साधला व तातडीने हवेली पोलिस आणि वन विभागाला माहिती दिली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वन अधिकारी, प्राथमिक बचाव पथकाचे जवान व स्थानिक नागरिकांनी बेपत्ता हेमंगचा शोध सुरू केला. तानाजी भोसले, योगेश गोपी, धनंजय सपकाळ, विश्वनाथ जावळकर,शेखर जावळकर, अमोल पटेल, ज्ञानेश्वर जावळकर,शंकर डोंगरे, रमेश खामकर,अमोल पढेर, मंगेश सांबरे यांनी दगडांच्या ढिगाऱ्याखाली दबलेला हेमंतचा मृतदेह बाहेर काढून कल्याण दरवाजाजवळ आणला.

पीएमआरडीएच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राचे प्रमुख सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद माने, ज्ञानेश्वर बुधवंत, किशोर काळभोर,अक्षय काळे, योगेश मायनाळे व सोन्याबापू नांगरे या जवानांनी मृतदेह सिंहगडावरील गाडीतळाजवळ आणला. अग्निशमन दलाच्या जवानांनी हेमंगचा मृतदेह त्याच्या वडिलांना दाखविण्यासाठी गाडीतळावर आणला आणि बॉडी कव्हर बॅगची चैन उघडली. जखमांनी रक्ताळलेले हेमंगचे शरीर पाहून त्याचे वडील गहिवरले होते. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आले होते. हवेली पोलिसांनी हेमंतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला.

Share