शिवसेनेला धक्क्यावर धक्के; उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतही शिंदे गटात सामील

मुंबई : शिवसेनेचे कोकणातील प्रमुख नेते आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमधील उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. उदय सामंत हे रविवारी गुवाहाटीसाठी रवाना झाले. आज सकाळपासून उदय सामंत हे ‘नॉट रिचेबल’ होते. त्यानंतर आता ते गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटात सहभागी होणारे उदय सामंत हे ठाकरे सरकारमधील नववे मंत्री आहेत.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे शनिवारी (२५ जून) मुंबईत ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीलाही उपस्थित राहिले होते. शनिवारीच मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असल्याने शंका उपस्थित झाली होती. मात्र, आता ते गुवाहाटीला पोहोचल्याने शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. आज रविवारी (२६ जून) गुवाहाटीला जाणाऱ्या चार्टड विमानाच्या लिस्टमध्ये सामंत यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. तसेच त्यांचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ येत होता. त्यांच्याशी अनेकदा मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, संपर्क होऊ शकत नव्हता. उदय सामंत यांच्या काही समर्थकांमध्ये सामंत हे गुवाहाटीला गेल्याची चर्चा सुरू होती. आता सामंत हे बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्यात राजकीय घडामोडी सुरू असताना मंत्री उदय सामंत शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहत होते. शुक्रवारी पाली येथील निवासस्थानी उदय सामंत यांनी दिवसभर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली. कुटुंबीयांशीही चर्चा केली. या चर्चेतील प्रतिसादाचा अंदाज घेऊन सामंत लवकरच भावी राजकीय दिशा ठरवतील, असा अंदाज मांडला जात होता. पत्रकारांशी बोलतानाही सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू समजून घेण्याची गरज असल्याचे मत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सामंत नक्की कुठे जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, सामंत आता एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. रविवारी दुपारी सोशल मीडियावर सामंत गुवाहाटीला रवाना झाल्याचे समजताच शिवसेना कार्यकर्त्यांना धक्का बसला. यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेतील गळती सुरूच
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. शिवसेनेचा एकेक मंत्री आणि आमदार बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत असल्याने शिवसेनेला दिवसेंदिवस धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत सध्या ९ मंत्री आहेत. एकापाठोपाठ एक शिवसेनेतील मंत्र्यांनी गुवाहाटीचा रस्ता धरला आहे. आज उदय सामंत हेसुद्धा गुवाहाटीला गेल्याने आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे एकमेव विधानसभेत निवडून आलेले मंत्री उरले आहेत.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कधी भावनिक आवाहन करून तर कधी निर्वाणीचा इशारा देत बंडखोर आमदारांना परत येण्यास सांगत आहेत, तर दुसरीकडे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट आणि मेळावे घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, शिवसेनेतील ही गळती सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर मंत्री आणि आमदारांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे. आता या बंडखोर मंत्र्यावर आणि आमदारांवर कधी आणि कशा पद्धतीने कारवाई केली जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे गटात ४८ आमदार
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या बंडखोरांच्या गटात सामील झालेले उदय सामंत हे शिवसेनेचे सातवे तर ठाकरे सरकारमधील नववे मंत्री आहेत. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या बंडखोरांच्या गटात शिवसेनेचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई. कृषिमंत्री दादा भुसे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून आलेले जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर हे सामील झाले आहेत. गुवाहाटीत एकनाथ शिंदे आणि वरील आठ मंत्र्यांसह अनिल बाबर, तानाजी सावंत, चिमणराव पाटील, प्रकाश सुर्वे, भरत गोगावले, विश्वनाथ भोईर, संजय गायकवाड, प्रताप सरनाईक, शहाजी पाटील, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, ज्ञानराज चौगुले, श्रीनिवास वनगा, महेश शिंदे, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, शांताराम मोरे, प्रकाश आबिटकर, योगेश कदम, आशिष जयस्वाल, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर, यामिनी जाधव, लता सोनावणे, किशोरी पाटील, प्रा. रमेश बोरणारे, सुहास कांदे, बालाजी किणीकर, राजकुमार पटेल, राजेंद्र यड्रावकर, चंद्रकांत पाटील, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, गीता जैन असे एकूण ४८ आमदार आहेत.

Share