मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवरील एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन घडवणारी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेत अदितीची भूमिका अभिनेत्री अमृता पवार साकारत आहे, तर सिद्धार्थच्या भूमिकेत हार्दिक जोशी आहे. अदिती आणि सिद्धार्थ ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत अदितीची भूमिका अभिनेत्री साकारणाऱ्या अमृता पवारने अल्पावधीतच आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. नुकतेच अमृता पवार ही नील पाटीलसोबत विवाहबंधनात अडकली आहे.
https://www.instagram.com/reel/Cfp-lyJKlIV/?utm_source=ig_web_copy_link
अमृता पवार आणि नील पाटील यांचा विवाह सोहळा बुधवारी पार पडला. अमृताने नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नव्या संसाराला सुरुवात केली आहे. अमृता पवार ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रिय असते. अमृता आणि नीलच्या विवाह सोहळ्याचे काही खास क्षण अमृताने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. अमृताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिच्या हळदीपासून लग्नापर्यंतची धामधूम पाहायला मिळत आहे. यात तिच्या लग्नाचे काही निवडक क्षण पाहायला मिळत आहेत. तसेच तिच्या लग्नात मित्र मैत्रिणी, कुटुंबाने केलेल्या गंमतीजमतीही दिसत आहेत.
या लग्नाचा व्हिडीओ पोस्ट करताना अमृताने त्याला हटके कॅप्शन दिले आहे. ”एक पाऊल पुढे…,” असे अमृताने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे अमृता पवार आणि नील पाटील यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित लोकांनी आणि अमृताच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत अमृता फार सुंदर दिसत आहे. तिने लग्नाच्या वेळी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती, तर रिसेप्शनच्या वेळी तिने छान डिझाईनर साडी नेसली होती.
काही दिवसांपूर्वी अमृता पवार आणि नील पाटील या दोघांचा हळदी सभारंभ पार पडला होता. यात ते दोघेही हळदीच्या रंगात रंगल्याचे पाहायला मिळत होते. अमृता-नीलचा साखरपुडा एप्रिल महिन्यात पार पडला होता. काल बुधवारी हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. अमृताने ‘सोनी मराठी’वरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘जिगरबाज’ या मालिकेत काम केले होते. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. या मालिकेत अमृता अदितीची भूमिका साकारत असून, तिच्या कामाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.