अभिनेता प्रसाद ओकला ‘धर्मवीर’ साठी मिळाला पहिलावहिला पुरस्कार

मुंबई : ठाण्याचे दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने प्रेक्षकांची खूप वाहवा मिळवली. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने मोठा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक याला पहिलावहिला पुरस्कार मिळाला आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी “महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास” या संस्थेने ‘शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ देऊन प्रसाद ओकला सन्मानित केले आहे. प्रसाद ओकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.

प्रसाद ओक केवळ अभिनेताच नाही तर एक उत्कृष्ट दिग्दर्शकही आहे. अलीकडच्या काळात त्याने ‘चंद्रमुखी’ आणि ‘धर्मवीर’ असे दोन सुपरहिट सिनेमे लागोपाठ दिले. सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले, तर ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली. या दोन्ही चित्रपटांचे सर्वत्र कौतुक सुरू आहे. अशातच प्रसाद ओकला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटासाठी लोकशाहीर आणि सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला. नुकताच हा पुरस्कार प्रसाद ओकला प्रदान करण्यात आला. हा मानाचा हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रसादने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रसाद ओक याने ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात केलेल्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला ‘कै. शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ मिळाला आहे. या पुरस्कारानंतर प्रसाद ओक याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून या पुरस्कारासंबंधी माहिती देऊन पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, ”पहिला पुरस्कार ‘धर्मवीर’साठी. सांगताना अत्यंत आनंद होतोय की, आज ‘धर्मवीर’ साठी यावर्षीचा दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान मला मिळाला. हा सन्मान मी मा. आनंद दिघे साहेबांना समर्पित करतो. ही संधी मला दिल्याबद्दल दिग्दर्शक मित्र प्रवीण तरडे आणि निर्माते मित्र मंगेश देसाई यांचे मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर खा.मा. श्रीकांतजी शिंदे आणि मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेही मनःपूर्वक आभार.”

https://www.instagram.com/p/CfskcBAoQ-5/?utm_source=ig_web_copy_link

या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल “महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास”, सौ. माणिकताई व श्री. पद्माकर मोरे आणि संतोष परब या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे…!!! पुरुषोत्तम बेर्डे सरांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला ह्याचाही आनंद आहेच…!!! लोकनेत्याच्या भूमिकेसाठी लोकशाहीराच्या नावाने सन्मानित व्हावं यासारखं भाग्य नाही…!!! श्री नटराजा…शतशः प्रणाम…!!!’ असेही प्रसादने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रसाद ओकने ‘धर्मवीर’ साठी मिळालेल्या या पहिल्या पुरस्काराबाबत पोस्ट करताना काही फोटोदेखील शेअर केले आहेत. तसेच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्रसाद म्हणतो की, ‘लोककलेचा सन्मान म्हणून ‘चंद्रमुखी’ बनवला, लोकनेत्याचा सन्मान म्हणून ‘धर्मवीर’ साकारले. त्यानंतर पहिला पुरस्कार लोकशाहीर दादा कोंडके यांच्या नावाने मिळावा, यापेक्षा लोकाश्रय अजून वेगळा काय असू शकतो.’

Share