सावधान, ‘तो’ पुन्हा येतोय ! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासीयांना इशारा

नवी दिल्ली : कोरोना विषाणू अजून गेलेला नाही. तो पुन्हा येत आहे. तो लोकांना साथीच्या रोगाविरुद्ध लढा सुरू ठेवण्याचा इशारा देत आहे. त्यामुळे देशवासीयांनी वेळीच सावध व्हावे आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला केले.
रविवारी गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील माँ उमिया धामच्या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोना हे एक मोठे संकट होते. आम्ही असे म्हणत नाही की, हे संकट संपले आहे. हा बहुरूपिया कोरोना पुन्हा कधी उगवेल हे कोणालाच माहीत नाही. त्याचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी लसींचे सुमारे १८५ कोटी डोस दिले गेले आहेत. जनतेच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले आहे. रासायनिक खतांच्या विळख्यातून पृथ्वीला वाचवण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहनही त्यांनी केले.


दरम्यान, देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिल्ली, हरियाणा आणि गुजरात या राज्यांत मागील एक आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत सरासरी वाढ झाली आहे, तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या १०५४ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर २९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
१.५५ टक्के इतका झाला आहे. दिल्लीत आतापर्यंत १८ लाख ६६ हजार १०२ इतक्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर २६ हजार १५६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. हरियाणात गेल्या दहा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. तसेच सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या एक्सई व्हेरिएंटचा पहिला रुग्ण मुंबईत आढळला आहे. हा रुग्ण मुंबईतील सांताक्रूझ भागातील रहिवासी असून तो मुंबईहून गुजरातमध्ये गेला होता. रुग्णाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले असता त्याला एक्सई व्हेरिएंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. एक्सई व्हेरिएंट घातक नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.मुंबईत कोरोनाचा नवा उपप्रकार ‘एक्सई’ आढळल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग वाढत आहे, याकडे लक्ष देण्याचे निर्देशही देण्यात आले असून, संसर्ग वाढण्यामागील कारणांसह तेथील लसीकरणाचे प्रमाण किती आहे, यावर अधिक काटेकोर लक्ष देण्याचेही सूचित करण्यात आले आहे.

Share