भगवा म्हणजे कोण भाजप की कॉंग्रेस? चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल

कोल्हापूर : उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात भाजपला अनुकूल वातावरण आहे. या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पोटनिवडणुकीत भगव्याला मतदान करा, असे आवाहन मतदारांना केले आहे; पण भगवा म्हणजे कोण भाजप की कॉंग्रेस? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेत भाजपवर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांचे भाषण संपते ना संपते तोच भाजपचे प्रदेशाध्यक्षचंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची चिरफाड केली. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या बाजूने कौल दिला होता पण शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ धरली. नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अविश्वासाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले असून, अविश्वासाने त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. अविश्वासाने निर्माण झालेले सरकार टिकवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे, असे चंद्रकांतदादा म्हणाले.


यापूर्वी ७ पैकी ५ वेळा कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेने जिंकली होती; पण सत्तेच्या हव्यासापायी उद्धव ठाकरेंनी ही जागा काँग्रेस उमेदवाराला सोडून कट्टर शिवसैनिकांना त्याग करायला लावला.कट्टर हिंदुत्ववादी असणारी कोल्हापूर उत्तरची जागा हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसला दिली गेली, हा शिवसेनेचा त्याग कशासाठी, सरकार टिकविण्यासाठीच ना? असा सवाल करून पाटील म्हणाले, कोल्हापूरची जागा हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसकडे जाऊ नये ही आमची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी एकप्रकारे भगव्याला म्हणजेच भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पण भगवा म्हणजे कोण भाजप की कॉंग्रेस? महाराष्ट्राचे हिंदुहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरेच आहेत, ते बनण्याचा प्रयत्न कोणीही केलेला नाही. हिंदुहृदयसम्राटऐवजी तुम्हीच जनाब लावत आहात, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी शिवसैनिकांना त्याग करावा लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सरकार टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेच्या खेळात राष्ट्रवादीच शिवसेनेला वरचढ होऊ लागली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आणि मला मुख्यमंत्रिपद टिकवायचे असल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा जोरदार प्रचार करावा, सगळी ताकद लावावी. शेवटी सेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बलिदान द्यावे, अशा आशयाचे भाषण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. त्यातून त्यांची अगतिकता दिसून येते, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Share