‘ईडी सरकार हाय हाय’; अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. विधानभवनातील पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, नितीन राऊत, नाना पटोले आदी उपस्थित होते मराठवाड्यातील अतिवृष्टी ग्रस्तांना सरकारची मदत मिळाली पाहिजे, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एखनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनाच्या पायऱ्यांवर पोहोचताच महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. ५० खोके एकदम ओके, आले आले गद्दार आले अशा घोषणांमुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याची सूचना गटाच्या आमदारांना केली. तसेच सरकारकडून बुधवारी विधीमंडळात २५ हजार ८२६ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या होत्या. यावरूनही विरोधक व सत्ताधारी यांच्यात खडाजंगी झाली. त्यामुळे आजही विरोधक व शिंदे गट यांच्यात जोरदार संघर्षाची शक्यता आहे.

Share