राणा दाम्पत्य २३ एप्रिलला ‘मातोश्री’ समोर हनुमान चालिसा पठण करणार

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करावे, नाहीतर आम्ही स्वतः येऊन ‘मातोश्री’ समोर हनुमान चालिसाचे पठण करू, असे आव्हान बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्याप्रमाणे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आता २२ एप्रिल रोजी मुंबईत जाणार असून, २३ एप्रिलला ते ‘मातोश्री’ समोर हनुमान चालिसा पठण करणार आहेत. राणांसोबत ५०० हून अधिक कार्यकर्ते असणार आहेत.

याबद्दल आ. रवी राणा म्हणाले, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मी उद्धव ठाकरेंना आवाहन केले होते की, ते जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत तेव्हा सगळ्या महाराष्ट्राला ग्रहण लागले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करा; पण हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ पर्वावर त्यांनी हे पठण केले नाही. त्यामुळे २२ एप्रिलला आम्ही निघणार आहोत आणि ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा वाचू. ज्याप्रमाणे वारी शांततेत निघते, त्याप्रमाणे आम्ही शांततेत हे पठण करणार आहोत. कोणताही गोंधळ होणार नाही. शांततापूर्वक आम्ही हनुमान चालिसा वाचून महाराष्ट्राच्या शांतीसाठी प्रार्थना करू.

आ. राणा म्हणाले, मला एक कळत नाही शिवसेना किंवा उद्धव ठाकरे एवढा विरोध का करत आहेत? हनुमान चालिसा वाचण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल? ज्या हिंदूंच्या नावावर आपण मते गोळा करतो, सत्तेवर येतो, मुख्यमंत्री बनतो, तिथे हनुमान चालिसाचा इतका विरोध का? आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी सन्मानाने म्हटले असते की’ ‘मातोश्री’च्या समोर बसून तुम्ही हनुमान चालिसा पठण करा. मला हे कळत नाही की, एवढा विरोध करून उद्धव ठाकरे महाराष्ट्राला कोणता संदेश देत आहेत? आज महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे, शेतकरी संकटात आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, विकासाची कामं थांबली आहेत. मुख्यमंत्री दोन दोन वर्षं मंत्रालयात जात नाहीत. कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बांधावर मुख्यमंत्री पोचत नाहीत, अशा प्रकारचे ग्रहण मुक्त करण्यासाठी आम्हाला हनुमान चालिसा वाचायची आहे.

Share