“संपले जरी श्वास तरी श्रेयस ते परत घेऊन येईल. श्वास जरी संपले तरी हात होता हाती… ; अमेय वाघ

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून श्रेयस तळपदेला ओळखले जाते. श्रेयसने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या श्रेयस तळपदेला डिसेंबर महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. मुंबईतील नामांकित रुग्णालयात श्रेयसला दाखल करण्यात आले होते. या संपूर्ण काळात श्रेयसला त्याची पत्नी दीप्तीने खंबीरपणे साथ दिली. हृदयविकाराचा झटका आलेल्या श्रेयसला त्याच्या पत्नीने मृत्यूच्या दारातून परत आणलं. आता एका कार्यक्रमादरम्यान श्रेयस तळपदेवर कविता सादर करण्यात आली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सध्या तो ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयसने ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्याची पत्नी दीप्ती तळपदेही उपस्थित होती. ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यावेळी श्रेयससाठी अमेय वाघने भावूक कविता सादर केली.

“संपले जरी श्वास तरी श्रेयस ते परत घेऊन येईल. श्वास जरी संपले तरी हात होता हाती… कारण, देवासोबत भांडत तिथे त्याची बायको उभी होती, देव म्हणाला जा परत…हिरो म्हणाला काय? आईच्या मनात मायेची, रसिकांच्या मनात प्रेमाची, मुलीच्या मनात ओढीची आणि बायकोच्या मनात साथीची अजूनही धडधड चालू आहे. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे…. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे”, अशी भावूक कविता अमेय वाघने श्रेयस तळपदेसाठी सादर केली. कविता ऐकून श्रेयससह त्याची पत्नी दीप्तीचे डोळे पाणावले. अमेयची ही कविता ऐकल्यानंतर श्रेयसने हात जोडून त्याचे आभार मानले.

Share