मुंबईः एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. केंद्र सरकारचा वानखेडेंची बदली करण्याचा निर्णय योग्य आहे. वानखेडेंच्या मनमानी कारभारावर चाप बसणे गरजेचे होते. कारण, ते काही लोकांसाठी लॉबिंग करत होते. समीर वानखेडे यांची बदली झाली असली तरी लढाई संपलेली नाही. हा लढा चालूच राहणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
मलिक पत्रकार परिषदेत हणाले, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे त्यांच्या कार्यकाळात ज्याप्रकारे फर्जीवाडा करत होते, त्यातील अनेक प्रकरणे आम्ही जनतेसमोर आणली होती. त्याचबरोबर विविध लेखी तक्रारीही केल्या. तसेच वानखेडेंना मुदतवाढ देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने आज त्यांना मुदतवाढ न देता त्यांना मूळ विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. निश्चितच हा योग्य निर्णय घेतला गेला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, “वानखेडेंना एनसीबीसाठी मुदतवाढ मिळाली नसली तरी त्यांनी जो फर्जीवाडा केला, त्याच्या तक्रारी आम्ही केल्या असून आमच्या तक्रारींवर कारवाई सुरु आहे. जात पडताळणी समितीकडे केलेल्या तक्रारीनंतर त्याची पण चौकशी सुरू आहे. लवकरच त्यावर निर्णय येईल आणि त्यांनी खोटे प्रमाणपत्र जमा केल्याचे सिद्ध होईल. त्याचबरोबर अल्पवयीन असताना स्वतःच्या नावाने सदगुरु बारचा परवाना घेतला होता. युपीएससीमधून नोकरी मिळाली असतानाही त्यांनी हा बारचा उद्योग सुरु ठेवला. तसेच दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी पत्नीचा व्यवसाय आणि संपत्तीबद्दलल माहिती लपवली होती. त्याबद्दल तक्रार केल्यानंतर तपास सुरू आहे. शिवाय आर्यन खान प्रकरणात एसआयटीकडून देखील तपास सुरू आहे. ज्या तक्रारी मी केल्या होत्या, त्याचा पाठपुरावा मी करणार आहे. जिथे जिथे चुका झाल्या, बेकायदेशीर कामे झाली आहेत, त्या तक्रारी सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल.”