सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी-बच्चू कडू

अकोलाः अवकाळी पाऊस व गारपिटीने ज्या शेतकऱ्यांचे तसेच अन्य नागरिकांचे नुकसान झाले असेल तर त्यांनी अजिबात खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

काल अकोला दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा तात्काळ करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत. यापूर्वीही अशा नुकसानीत राज्यात सर्वाधिक व सर्वात आधी मदत मिळवून दिलासा देण्याचे काम अकोला जिल्ह्यात झाले होते. यावेळीही यंत्रणा आपल्या बांधावर येऊन पंचनामा करुन अहवाल सादर करेल. त्यानुसार शक्य तितक्या लवकर मदत मिळवून देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत स्वतःला एकटे समजू नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात कडू यांनी शेतकऱ्यांना व आपत्तीग्रस्तांना दिलासा दिला आहे.

Share