उत्तर प्रदेशात १ लाख भोंगे उतरवले; रस्त्यावरील नमाजही बंद

लखनौ : एकीकडे महाराष्ट्रात मशिदीवरील गदारोळ सुरू असताना उत्तर प्रदेशात मात्र शांततेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यात येत आहेत. भोंगे उतरवत असताना उत्तर प्रदेशात अद्याप कोणताही वाद झालेला नाही. मुस्लिम बांधवांनी सहकार्य करत भोंगे उतरवण्यात उत्तर प्रदेश प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य केले आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशात सुमारे १ लाख भोंगे उतरवण्यात आले आहेत. आता रस्त्यावर कुणीही नमाज अदा करत नाही, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली होती. ज्या मशिदीवरील भोंगे हटणार नाहीत, त्या मशिदीसमोर भोंग्यावरून हनुमान चालिसा पठण करावी, असे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी आज (४ मे) पासून आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारला कसरत करावी लागत आहे. उत्तर प्रदेशात मात्र भोंगे काढताना अद्याप कोणताही वाद झाला नाही.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, आमच्या सरकारने भोंग्याचे प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळले आहे. उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवरून आतापर्यंत सुमारे १ लाख भोंगे हटवण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात भोंगे हटवल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात कर्कश कमी झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भोंगे हटवताना कुठेही वाद झाला नाही. यूपी पोलिस सातत्याने भोंग्यांविरोधात मोहीम राबवत आहेत.

आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही तर रस्त्यावरील नमाज पठण करण्याचा प्रश्नही सोडवला आहे. रस्त्यावर नमाज अदा करू नये, असे सक्त आदेश आम्ही दिले होते. आता रस्त्यावर कुणीही नमाज अदा करत नाही. उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांची संख्या २५ कोटींच्या आसपास आहे. असे असूनही ईदच्या दिवशीदेखील कुठेही रस्त्यावर नमाज अदा करण्यात आली नाही. रस्ते हे वाहतुकीसाठी असतात. लोक स्वतःही पुढे येऊन रस्त्यांऐवजी घरांत किंवा मशिदीत नमाज अदा करून नवीन आदेशाचे पालन करत आहेत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

Share