मुंबई : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले. या मंत्रालयासाठी २०६३ पदांची निर्मिती करण्यात आली असून ११४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती देतानाच अशा प्रकारे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपले राज्य हे सर्वं सामान्यांच्या हितासाठीचे राज्य आहे. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असावे अशी सगळ्यांची भावाना होती. या राज्यात लोकांच्या हिताचेचे निर्णय होणार आहेत. आज दिव्यांगांसाठी सोन्याचा दिवस असून स्वतंत्र विभाग अस्तित्वात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी कुठलाही संघर्ष न करता हे स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे.
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यातील स्वतंत्र #दिव्यांग_कल्याण विभागाची घोषणा करण्यात आली. राज्यात नव्याने निर्माण झालेल्या विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी वर्षानुवर्षे दिलेल्या लढ्याला न्याय मिळाल्याचे मत व्यक्त केले.#InternationalDayofPersonswithDisabilities pic.twitter.com/s7SacTKwGZ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 3, 2022
दिव्यांगावरील गुन्हे मागे घेणार
या स्वतंत्र मंत्रालयासाठी सचिव दर्जाचे अधिकारी असतील. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळं हे मंत्रालय करेल. दिव्यांगाच्या मागण्यांबाबत आंदोलनामध्ये दिव्यांगावर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी गृह विभागाला सूचना करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.