’५० खोके एकदम ओके’; विरोधकांची विधिमंडळ परिसरात घोषणाबाजी

मुंबई : शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या अधिवेशनााला आजपासून सुरु झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी एकत्र जमून शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ‘५० खोके…एकदम ओके, ईडी सरकार हाय हाय’ अशा घोषणा दिल्यात. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्पादन मंत्री शंभूराजे देसाई हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी चालले होते. त्यामुळे विरोधकांनी ‘५०खोके एकदम ओके’ जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी शंभू राजे देसाई यांनीही ‘पाहिजे का?’ असं म्हणून विरोधकांना उत्तर दिलं.

दरम्यान, विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीनंतर सभागृहामध्ये विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे यांनी राष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सादर केला. तर विरोधकांची स्थगन प्रस्ताव सादर करण्याची मागणी होती. पण, ती मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली.

Share