अखेरच्या क्षणात ‘केके’ सोबत काय काय घडले? व्हिडीओ व्हायरल

कोलकाता : प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’ यांचे मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास कोलकाता येथे अकाली निधन झाले. कोलकातामध्ये एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. के. के. यांच्या कोलकात्यामधील शेवटच्या कॉन्सर्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अखेरच्या क्षणात के. के. सोबत काय काय घडले याची माहिती समोर आली आहे.

५३ वर्षीय के. के. यांच्या मृत्यूबद्दल देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने बॉलिवूडसह संगीत विश्वावर दु:खाची लाट पसरली आहे. मंगळवारी (३१ मे) रात्री कोलकाता येथील गुरुदास कॉलेजच्या फेस्टसाठी नजरुल मंच येथे म्युझिक काॅन्सर्टमध्ये लाइव्ह परफाॅर्म करत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचले. तेथून त्यांना रात्री १०.३० वाजता कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (सीएमआरआय) नेण्यात आले, तेथे त्यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केले. हे रुग्णालय के. के. ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तेथून केवळ ५ किलोमीटर लांब होते. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

नजरुल मंच येथे लाइव्ह काॅन्सर्टमध्ये जे काही घडले त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये अखेरच्या क्षणात के.के. यांच्यासोबत काय काय घडले, याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये के.के. यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. कॉन्सर्टदरम्यान के. के. यांना उष्णतेचा खूप त्रास होत होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये के. के. घाम पुसताना दिसत आहेत. त्यानंतर ते एका व्यक्तीला इथे खूप गरम होत आहे. इथला एसीदेखील ठीक सुरू नाही, असे सांगताना दिसत आहेत.

के. के. यांना मंचावर गाणे सादर करत असतानाच अस्वस्थ वाटत होते. मंचावर गाणे गात असताना त्यांना त्रासदेखील होत होता. त्यांनी स्पॉट लाईट बंद करायला सांगितला होता. माझी तब्येत ठीक नाही, मला फार गरम होत आहे. अस्वस्थही वाटत असल्याचे वारंवार ते सांगत होते. के. के. यांनी खूप जोशात या कॉन्सर्टला सुरुवात केली होती; पण कॉन्सर्ट सुरू होताच त्यांची प्रकृती हळूहळू खूराब होऊ लागली. समोर आलेल्या व्हिडिओत दिसते आहे की, ते वारंवार एका टॉवेलने घाम पुसत होते. एसी सुरू नसल्याचा अंदाज यातून बांधला जात आहे. त्यांना सातत्याने घाम येत होता. या व्हिडीओमध्ये त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे आणि ते मध्येच पाणी पित असल्याचे दिसत आहे. स्टेजवर येरझाऱ्या मारण्यातून त्यांची अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CeP7q0_oWEt/?utm_source=ig_web_copy_link

यानंतरही के. के. यांच्या छातीत दुखू लागल्याने ते कॉन्सर्टमधून बाहेर पडले होते. त्यावेळचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया अहवालानुसार, इव्हेंटनंतर ते जमिनीवर कोसळले होते. त्यामुळे त्यांचे डोकं आणि चेहऱ्यावर जखम झाली आहे. कोलकाताच्या कॉन्सर्टमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर त्यांना सीएमआरआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

Share