माझ्या पराभवाचंही मला सोनं करता आलं, हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला : पंकजा मुंडे

बीड : तुमचं काय भविष्य आहे, तुम्हाला काय मिळणार आहे, असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो; पण दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचंही मला सोनं करता आलं, यापेक्षा मोठी पुण्याई कुणाकडे आहे? हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला. हा पराभव मला शिवराजसिंह चौहान यांच्यासारख्या सरळ स्वभावाच्या सात्विक मोठ्या नेत्यापर्यंत घेऊन गेला, अशा भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त आज (३ जून) परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर पार पडलेल्या अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती.

मी सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी लढणार
या कार्यक्रमात भाषण करताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीबाबत महत्त्वाचं विधान केलं. पंकजा म्हणाल्या, तुम्ही माझी चिंता करू नका, मला सगळे विचारतात, तुमचं काय भविष्य आहे, उद्या काय होणार आहे, तुम्हाला काय मिळणार आहे, याची मला खरंच अजिबात चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत माझा जो पराभव झाला त्यातून मी खूप काही शिकले. मला माझ्या निवडणुकीतील पराभवाचं सुद्धा सोनं करता आलं, यापेक्षा मोठी पुण्याई कुणाकडे आहे? मी सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी लढणार आहे. तुमच्या सेवेसाठी मी अविरत काम करणार आहे. आपलं भविष्य कुणीही बिघडवू शकत नाही, तुम्ही आहात जे एखाद्याचं भविष्य घडवू किंवा बिघडवू शकतात, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, आज मुंडेसाहेबांचं ८ वं पुण्यस्मरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारलाही ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंडेसाहेबांना आपल्यातून जाऊन आज ८ वर्षे झाली. आजच्याच दिवशी आठ वर्षांपूर्वी केंद्रात मोदी सरकार सत्तेत आलं. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचा सत्कार याच गडावर होणार होता. इथला प्रत्येकजण त्यासाठी उत्सुक होता; पण आम्हाला याच ठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागले. आज मला त्या दिवसाची आठवण येते. सूर्योदय जर कोणी काळा असतो का, असं विचारलं तर मी सांगेन की, ३ जून हा काळा दिवस आहे. आजच्याच दिवशी मुंडेसाहेब आपल्यातून गेले. मुंडेसाहेब गेल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार, असा सवाल होता. त्यासाठी मी गोपीनाथ गडाची निर्मिती केली. हे माझ्यासाठी नाही, तर हे या लोकांसाठी आहे. या लोकांना माझ्याकडून काहीही अपेक्षा नाही, यांना फक्त एका व्यक्तीला पाहायचं आहे, जो मुंडेंविषयी प्रेम मनात ठेवतो आणि गरीब, वंचितांचं काम करतो. बहुजनांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. असा कुठलाही महाराष्ट्रातला नेता नाही जो गोपीनाथराव यांच्यासाठी इथे आला नाही.

महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण करण्यासाठी आशीर्वाद द्या

पुण्यस्मरणाच्या दिवशी ताई का हसत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. महाभारत, सत्संग आपण पाहिलं. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम नव्हे तर मानवता हा खरा धर्म. आज सकाळी टीव्ही लावून मोहन भागवत यांचं भाषण पाहात होते. हिंदू-मुस्लिम वाद आपल्याला मिटवायचं आहे. महिला विकृतीच्याद्वारे विकल्या जात आहेत. स्त्रियांची प्रतारण करणे हे छत्रपतींच्या राज्यात कधीच सहन होणार नाही. आता जे सरकारमध्ये चाललंय, जे टीव्हीवर पाहायला मिळतंय, त्याविषयी मनामध्ये मला विषाद वाटतो. जात, धर्म व्यक्तिगत हेवेदावे, याच्यापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण करण्यासाठी आणि देशात मुंडेसाहेबांसारखं नाव करण्यासाठी तुमचे आशीर्वाद लाभू द्या, अशी भावनिक साद पंकजांनी घातली.

सत्त्व, तत्त्व आणि ममत्व या तीन सूत्रांवर माझं जीवन
जीवनात कर्म आणि धर्म एका हातात हात घेऊन चालत असतात. धर्माने कुणी वाईट वागत असेल तर कितीही चांगलं कर्म करून जमणार नाही. अधर्म करून तुम्ही चांगलं काम केलं, पूल बांधले, बंधारे बांधले, रस्ते बांधले, त्यामध्ये कार्यकर्त्यांना पैसे खायला द्याल; पण असं राजकर्त्यांकडून अपेक्षित नाही. कर्म आणि धर्म एकत्र जायला पाहिजेत. अशा प्रकारचं राजकारण केलं पाहिजे. जीवन जगताना सत्त्व, तत्त्व आणि ममत्व या तीन सूत्रांवर माझं जीवन आहे. सत्त्व राजकारणात पाहिजे. कुणी कितीही वेड्यात काढलं की, ताई, तुम्हाला हे जमलंच नाही तर मला कधीच वाईट वाटलं नाही. मला कुणाचं हृदय तोडणं जमलं नाही. सामान्य माणसाशी नाळ जोडण्याचं काम जमलं. सत्त्व सोबत घेऊन तत्त्वाने काम करून आपल्याला लोकांच्या मनात ममत्व निर्माण करता आलं पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांनी यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कामांचे तोंड भरून कौतुक केले. या कार्यक्रमास बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञाताई मुंडे, रासपचे महादेव जानकर यांच्यासह भाजप नेते, कार्यकर्ते तसेच मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share