जिल्हा लवकरच लसीकरणयुक्त होईल – पालकमंत्री देसाई

औरंगाबाद : जिल्ह्याची  विविध विकासात्मक कार्याच्या माध्यमातून घोडदौड कायमच सुरू राहणार आहे. कोरोना, ओमायक्रॉनसारख्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, असे सांगतानाच ‍जिल्हा प्रशासनाच्या कामाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कौतुक केले. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतल्यास जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने लवकरच जिल्हा लसीकरणयुक्त होईल, अशी अपेक्षाही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला उद्देशून केलेल्या शुभेच्छा संदेशात देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शासनाने मागील दोन वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. त्यामुळे कोरोना, ओमायक्रॉनसारख्या संकटालाही खंबीरपणे सामोरे जाता आले.  गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत संसर्गाला रोखण्याच्या दिशेने लसीकरणाची सुरुवात एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल आहे.

जिल्ह्याने कोरोना लसीकरणाला प्राधान्य देऊन संपूर्ण जिल्हा कोरोना लसीकरणयुक्त व्हावा, यासाठी विशेष पुढाकार घेतला. जनतेनेही लसीकरणामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांनी लस घेण्यासाठी प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची दखल मंत्रिमंडळात घेतली याचा मी स्वत: साक्षीदार आहे.  जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली. सर्व यंत्रणांच्या प्रयत्नांचे फलित म्हणजे १०लाखांच्यावर लसीकरण झाले. याकाळात पहिला डोस घेणारे लाभार्थी आता दुसऱ्या डोससाठी पात्र ठरणार आहेत. ४५वर्षांवरील नागरिक, कोरोना योद्धे आदींसह ८१टक्क्यांहून अधिकांनी पहिला, ४५टक्क्यांनी दुसरा कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस घेतला आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी शासनाने पाच लाखांची मदत जाहीर केलेली आहे. त्यात जिल्ह्यातील २७ बालकांपैकी २० बालकांना मदत देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिली आहे.

Share