मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर असणारी पोस्ट प्रसिद्ध केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला तिच्याविरोधात दाखल उर्वरित २१ गुन्ह्यांमध्ये अटक करणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारने आज (सोमवार) उच्च न्यायालयात दिली.
अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर असणारी कविता पोस्ट केली होती. त्यावरून राज्यभर वादंग निर्माण झाले होते. याप्रकरणी ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्वप्नील नेटके यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळवा पोलिसांनी १४ मे रोजी केतकी चितळेला अटक केली होती. त्यानंतर केतकीने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका प्रलंबित असतानाच केतकीने अटकेला आव्हान देणारी याचिकाही दाखल केली होती. तिच्या दोन्ही याचिकांवर आज (२७ जून) उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
केतकीविरोधात एकूण २२ गुन्हे दाखल असून, कळवा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात केतकीला नुकताच जामीन मंजूर करण्यात आला आहे. केतकीच्याविरोधात दाखल असलेल्या अन्य गुन्ह्यांतही आम्ही तिला अटक करणार नाही, असे सरकारी वकील अरूणा पै यांनी या सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यांचे हे म्हणणे नोंदवून घेतले व या प्रकरणाची सुनावणी १२ जुलै रोजी ठेवली आहे.