Election Result 2022 : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा , पंजाब आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकाल स्पष्ट होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.
उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात ७० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. भाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, काँग्रेसचे हरीश रावत आणि आम आदमी पक्षाचे कर्नल (सेनि) अजय कोथियाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली आहे. या विधानसभा निवडणुकीत ५९.३७ टक्के मतदान झाले आहे.
गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपाला आवाहन देण्यासाठी काँग्रेस सोबतच शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस आपल्या पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरली आहे. गोव्यात एकाच टप्प्यात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत ७५.२९ टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
पंजाबमध्ये विधानसभेच्या ११७ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारांनी समिश्र प्रतिसाद दर्शवला. पंजाबमध्ये ६५.३२ टक्के मतदान झाले होते. पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचार केला होता.
मणिपूरमध्ये विधानसभेच्या ६० जागांसाठी २८ फेब्रुवारी ते ५ मार्च अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात ७८. ३० टक्के मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात ७८.४९ टक्के मतदान झाले.
उत्तरप्रदेश विधानसभेच्या ४०३ जागांसाठी १० फेब्रुवारी ते ७ मार्च अशा सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी रोजी ६२.४३ टक्के मतदान झाले, दुसऱ्या टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी ६४.६६ टक्के मतदान झाले, तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारी रोजी ६२.२८ टक्के मतदान झाले,चौथ्या टप्प्यात २३ फेब्रुवारी रोजी ६२.७६ टक्के मतदान झाले, तर पाचव्या टप्प्यात २७ फेब्रुवारी रोजी ५८.३५ टक्के मतदान झाले, सहाव्या टप्प्यात ३ मार्च रोजी ५६.४३ टक्के मतदान झाले, तर सातव्या टप्प्यात ७ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ४६.४० टक्के मतदान झाले होते. उत्तर प्रदेश मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सभा घेतल्या. तर अखिलेश यादव यांनी देखील आपला पूर्ण जोर या निवडणुकीत लावल्याचे दिसले. मात्र मायावती या निवडणुकीत हव्या तितक्या सक्रिय दिसल्या नाहीत.