आला उन्हाळा… आरोग्य संभाळा

ऋतूमानात बदल झाला, तर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ , प्रखर सुर्यप्रकाश यामुळे दुपारी बाहेर पडणे अनेकदा नकोसे वाटते. हवामानातील बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. उन्हाची तीव्रता वाढल्याने प्रामुख्याने त्वचाविकार, उलट्या, उष्माघात, अॅसिडिटी, डोळे तापणे, चक्कर येणे, थकवा येणे हे आजार संभवतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपले पाहिजे. हे आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.

काळजी कशी घ्यावी
उन्हाळ्यात होणारे आजार व उष्माघातचा त्रास आपण टाळू शकतो, मात्र त्यासाठी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा वातावरणातील तापमान खूप वाढू लागते, त्यावेळी शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे. विशेषतः दुपारी ११ ते ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने बाहेर पडू नये. कुठेही बाहेर जाताना कायम सोबत गोड पदार्थ किंवा चॉकलेट ठेवावे. जेणेकरून ग्लानी आली असता इलेक्ट्रोल पाणी प्यायल्याने त्वरीत आराम मिळतो.

भरपूर पाणी प्या
उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अनेकांना डीहायड्रेशनचा त्रास होतो. म्ह्णूनच भरपूर पाणी प्या. पाण्यात चिमुटभर मीठ टाकून प्यायल्यास उन्हामुळे कमी झालेल्या क्षारांची भरपाई होते. तसेच उन्हातून आल्यानंतर लगेचच फ्रिज अथवा कूलरचे अतिगार पाणी पिऊ नये. शरीराच्या तापमानात अचानक बदल झाल्यास आजारी पडण्याची शक्यता असते.

योग्य फळ खा
नैसर्गिकरित्या थंडावा देणारी फळे आहारात घ्या. काकडी ,कलिंगड ,खरबूज, कोकम यांचा आहारात समावेश करा. गोड फणस अतिप्रमाणात खाऊ नका. यामुळे शरीरात पाण्याची आवश्यकता वाढते. तसेच घरीच केलेली सरबत , कैरीचे पन्हे प्या. बाजारात मिळणारी सरबते व फळांचे रस खरे तर वाईट नाहीत मात्र त्यात अतिप्रमाणात साखर मिसळलेली असल्याने शरीरातील साखर व पाण्याचा समतोल बिघडतो. म्हणून ती टाळावीत.

समतोल आहार घ्या 
उन्हाळ्यात फार जेवणे शक्य होत नसल्याने प्रामुख्याने साधे व ताजे अन्न घ्या. शिळे अन्न मासे , मटण खाणे टाळा. जेवणानंतर वाटीभर ताक किंवा सोलकडी घेणे हितकारी आहे.आहाराइतकाच विहारही महत्त्वाचा आहे. त्यामुळे संध्याकाळी उन्हे उतरल्यानंतर काही वेळासाठी अवश्य फिरायला जा.

हे कपडे परिधान करावेत
उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो फिकट व पांढऱ्या रंगाचे सैल कपडे घालावेत. काळ्या किंवा निळ्या गडद रंगाचे कपडे घालणे शक्यतो टाळावे. कारण गडद रंग तुलनेने जास्त उष्णता शोषून घेतो. घाम शोषून घेतला जाईल असे कपडे घालणे अधिक चांगले. बाहेर पडताना टोपी, स्कार्फ व छत्रीचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगलचा वापर करावा तर उन्हात बाहेर जाताना शरीराला सनस्क्रीम आदी १५ मिनिटे लावून मग घराबाहेर पडणे योग्य ठरेल. तसेच बाहेर जाताना सहसा कॉटनचा सनकोट घालणे व शक्य असल्यास हातात ग्लोव्हज् घालणे गरजेचे आहे.

मधुमेहींनी मोरावळा, गुलकंद टाळा
उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी तसेच उन्हापासून रक्षण करण्यासाठी मोरावळा व गुलंकद खाणे हितकारी आहे. मात्र यामध्ये अतिप्रमाणात साखर वापरली जात असल्याने मधुमेह असणार्‍या व्यक्तींनी मोरावळा, गुलकंद खाणे टाळा. तसेच आईस्क्रिम व मिल्कशेक खाणे देखील टाळावे.

Share