रामनवमी उत्सवासाठी शिर्डी सजली

 

शिर्डी : सुमारे १११ वर्षांची परंपरा असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरात आज पहाटे काकड आरतीने रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली. रामनवमी उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांची शिर्डीत गर्दी वाढली आहे.साई नामाच्या गजराने संपूर्ण शिर्डी दुमदुमून गेली आहे. श्रीरामनवमीला मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात येणार असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.
शिर्डीत दरवर्षी तीन दिवस रामनवमी उत्सव साजरा केला जातो. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने यंदा शिर्डीत रामनवमीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. उद्या रामनवमीचा मुख्य दिवस असून रामनवमी उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होत आहेत. आज पहाटेच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतिमा, वीणा आणि साईसच्चरित्र ग्रंथांची मिरवणूक व्दारकामाईपर्यंत नेण्यात आली. मिरवणुकीत साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे हे पोथी, उपाध्‍यक्ष अॅड.जगदीश सावंत व विश्‍वस्‍त अॅड.सुहास आहेर हे साईबाबांची प्रतिमा व विश्‍वस्‍त अविनाश दंडवते हे वीणा घेऊन सहभागी झाले होते. याप्रसंगी विश्‍वस्‍त सचिन गुजर, राहुल कनाल, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर, प्रभारी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे, संरक्षण अधिकारी अण्‍णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी यांच्यासह साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. द्वारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करण्यात आले. श्री रामनवमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात संस्‍थानचे अध्‍यक्ष आशुतोष काळे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी चैतालीताई काळे यांच्‍या हस्‍ते पाद्यपूजा करण्‍यात आली.
शिर्डीतील रामनवमी उत्सव आणि पालखीचे एक वेगळे नाते असल्याने या उत्सवासाठी खासकरून मुंबईहून मोठ्या प्रमाणात पालख्या दाखल होतात. पंधरा दिवसांचा पायी प्रवास करून शिर्डीत येऊन साईंच्या दर्शनासाठी भाविक आतूर झालेला असतो. १११ वर्षांची परंपरा असणारा हा उत्सव आजही तितक्याच उत्साहाने साजरा केला जात आहे. शिर्डी येथे श्रीरामनवमी उत्‍सवाची सुरुवात शके १८३३ म्हणजेच १९११ साली साईबाबांच्या अनुमतीने करण्‍यात आली. तेंव्‍हापासून दरवर्षी हा उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. प्रथम हा उत्सव उरुसापोटी जन्माला आला. त्यावेळी केवळ मोठ्या प्रमाणात उरुसच शिर्डीत भरत असे. मात्र, साईभक्त भिष्म यांनी हा उरुस रामनवमी उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची साईबाबांना विनंती केली. त्यावेळेपासून साईबाबांच्या आज्ञेनेच भिष्म आणि गोपाळराव गुंड या भाविकांनी रामनवमी उत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा आणि हा उत्सव सुरू आहे.

रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांची मांदियाळी देशभरातून शिर्डीत जमते. आषाढी एकादशीचे वेध लागले की, वारकऱ्यांची दिंडी ज्या प्रमाणे पंढरपूरकडे निघते त्याचप्रमाणे रामनवमीसाठी साईभक्तांच्या पायी पालख्या शिर्डीकडे येतात. मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत या प्रमुख शहारांच्या बरोबरीनेच अनेक गावांतूनही शिर्डीला भाविक पायी चालत येतात. पायी चालत आले की, आपले दुख, संकट दूर करून आपल्या मनोकामना साईबाबा पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा असते. आज रामनवमी उत्सवाचा पहिला दिवस असल्याने रात्री साईंच्या पालखीची गावातून मिरवणूक काढली जाणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून साईमूर्तीलाही विविध अलंकारांनी सजविण्यात आले आहे. शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व राहण्याची व्यवस्था, तसेच जागोजागी मंडप व्यवस्थाही करण्यात आली आहे.

Share