मुंबई : मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेने आज राम नवमीचे औचित्य साधून थेट शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण करून शिवसेनेला डिवचले. हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील दादर परिसरात असलेल्या शिवसेना भवनासमोर लाउडस्पीकरवर हनुमान चालीसाचे पठण केले. पोलिसांनी नंतर लाउडस्पीकर जप्त करून मनसैनिकांवर कारवाई केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदीसमोर भोंगे लावून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून आले होते. काही कार्यकर्त्यांनी राजीनामेदेखील दिले होते. पुणे मनसेचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक वसंत मोरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या विरोधात भूमिका घेत राज ठाकरे यांची नाराजी ओढवून घेतली होती. त्यातून मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. मशिदीवरील भोंग्यांवरुन राजकारण तापलेले असताना आणि राज्यभर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दावे-प्रतिदाव्यांचे राजकारण रंगलेले असतानाच मनसेने राज्यातील विविध भागात मंदिरात हनुमान चालिसा लावत आंदोलन केले. आज रविवारी मनसेने दादर भागातील शिवसेना भवनासमोर रथातून हनुमान चालिसा पठण करत शिवसेनेला डिवचले आहे.
शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिसा पठण करूनशिवसेनेला हिंदुत्वासाठी जागे करण्याचा प्रयत्न असल्याचे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपले हिंदुत्व सोडून दिले. बाळासाहेब ठाकरे यांची हयात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करण्यात गेली, त्या पक्षांसोबत ते जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली, त्यांना देखील या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की, तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व सोडून लाचारी स्वीकारली आहे. ती बंद करा आणि देशधर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्राचे निर्माण करुयात, असेही किल्लेदार म्हणाले. यानंतर दादर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन लाउडस्पीकर जप्त केले आणि किल्लेदार व त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईचा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी निषेध केला आहे. शिवसेना भवन ही काही मशीद नाही. ज्याच्यासमोर हनुमान चालिसा लावली म्हणून कारवाई केली. शिवसेना भवन हे हिंदूंचे पवित्र स्थळ आहे. मग कारवाई का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना अशा पद्धतीने कारवाई होतेय हे दुर्दैव आहे. ज्या टॅक्सीवर स्पीकर लावण्यात आले होते, ती टॅक्सी विभागात फिरवण्यात येणार होती. राम नवमीनिमित्त हनुमान चालिसा लावणे गुन्हा आहे का? असा सवालही देशपांडे यांनी केला आहे.