देशात लवकरच रामराज्य येईल -राज्यपाल कोश्यारी

नाशिक : अयोध्येत लवकरच प्रभू श्री रामाचे मंदिर उभारले जाणार आहे, पण देशात लवकरात लवकर रामराज्य येणार आहे, याबद्दल मी देवाकडे प्रार्थना केली आहे, असे वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नाशिक येथे केले.

श्री रामनवमीच्या निमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन विधीवत पूजा करून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार राहुल ढिकले, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


या ठिकाणी मी प्रत्येक वेळेस येऊ शकणार नाही; पण आपण तरी इथे दररोज दर्शन घ्या. प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. आपण प्रभू श्रीरामाचे चारित्र्य जेवढे अभ्यासू, तेवढी आयुष्यात प्रगती होईल. प्रभू श्री रामचंद्र यांनी रावणाचा वध करून श्रीलंका जिंकली व श्रीलंकेला जिंकल्यानंतर रामाने देश परत केला होता. प्रभू श्रीरामांचा हा मोठेपणा आहे. श्रीरामाचे चरित्र जितके वाचाल तितके तुमचे आयुष्य आणखी सुकर होईल, असेही राज्यपाल कोश्यारी यावेळी म्हणाले.

महात्मा गांधीसुद्धा ‘रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीता राम’ म्हणत होते. त्यामुळे तुम्ही आयुष्यात श्रीरामाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. मग आपण सामान्य कार्यकर्ते असो, सामान्य व्यक्ती असो किंवा राजकीय व्यक्ती असो सर्वांनी रामाचा आदर्श ठेवला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी केले.

Share