अभिनेता शिवकुमार सुब्रह्मण्यम यांचे निधन

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि पटकथा लेखक शिवकुमार सुब्रह्मण्यम यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्‍यांच्‍या निधनाने चित्रपट जगतावर शोककळा पसरली आहे.
शिवकुमार सुब्रह्मण्यम हे अनेक दिवसांपासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. कर्करोगाशी झुंज देत असताना १० एप्रिल रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन महिन्यांपूर्वी ११ फेब्रुवारी रोजी त्यांचा एकुलता एक मुलगा जहान याचा ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसला होता. चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिवकुमार सुब्रह्मण्यम यांच्या निधनाची बातमी दिली आहे. “अत्यंत दु:खद अंत:करणाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की, अत्यंत प्रतिभावान कलाकार शिव सुब्रह्मण्यम यांचं निधन झालं”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
शिवकुमार सुब्रह्मण्यम यांनी अनेक चित्रपट, टीव्ही मालिकामधून आपल्या अभिनयाची झलक दाखविली होती. ‘टू स्टेट्स’ या चित्रपटामध्ये त्यांनी आलिया भट्टच्या वडिलांची भूमिका साकारली होती. शिवकुमार यांनी विधू विनोद चोप्रा यांच्या ‘परिंदा’ आणि सुधीर मिश्रा यांच्या ‘हजारों ख्वाइशे ऐसी’ या चित्रपटाची पटकथा लिहिली. या चित्रपटांशिवाय त्यांनी ‘तीन पट्टी’, ‘प्रहार’ आणि राणी मुखर्जी अभिनित ‘हिचकी’ या चित्रपटातही काम केले होते. ‘मुक्ती बंधन’ या टीव्ही शोमध्येही ते चमकले होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी आणि उल्लेखनीय आणि तितक्या धीरगंभीर भूमिका साकारल्या.

‘टू स्टेट्स’ या चित्रपटात शिवकुमार सुब्रह्मण्यम आणि आलिया भट्ट यांची वडील -मुलीची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती. या चित्रपटातील दोघांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार असून, लग्नाच्या घाईगडबडीत असतानाच शिवकुमार सुब्रह्मण्यम यांचे निधन झाल्याने आलियाला मोठा धक्का बसला आहे. शिवकुमार यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत असून, अनेक सेलिब्रिटींनी त्‍यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Share