मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी सोमवारी शिवतीर्थवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आपण १०० टक्के समाधानी असून, मी पहिल्यापासून मनसेतच आहे आणि राहीन. इतर पक्षांकडून असलेल्या सर्व ऑफर्स आता निकालात निघाल्याचे सांगत वसंत मोरे यांनी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या भेटीनंतर ‘जय श्रीराम’चा नारा देत वसंत मोरे यांनी एकप्रकारे पक्षाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाशी जुळवून घेण्याचे संकेतच दिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा आदेश मनसैनिकांना दिला होता. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. आमच्या भागातील नागरिक जाब विचारू लागले असल्याचे सांगत पुण्यातील काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर वसंत मोरे यांनीही राज ठाकरे यांच्या भूमिकेशी असहमती दाखवत माझ्या प्रभागात भोंगे लावणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मी माझ्या प्रभागातील मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, अशी भूमिका मोरे यांनी घेतली होती. यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यातील इतर पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेत वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करून त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेतून बाहेर पडतील, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह अनेक राजकीय पक्षांनी ऑफर्सही दिल्या होत्या. मात्र, राज ठाकरे यांच्यासोबतच्या आज झालेल्या बैठकीनंतर वसंत मोरे हे मनसेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वसंत मोरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना आपली मशिदीवरील भोंग्यांबाबतची भूमिका समजावून सांगितली. तसेच याबाबत सार्वजनिकरित्या आक्षेप व्यक्त केल्यावरून राज यांनी वसंत मोरे यांच्यावर नाराजीही व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माझ्या ज्या शंका होत्या त्या सर्व दूर झालेल्या आहेत. राज ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर आपण पूर्णपणे समाधानी झालो असल्याची प्रतिक्रिया मोरे यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.
पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर वसंत मोरे नाराज होते. याविषयी आजच्या बैठकीत चर्चा झाली का, असे मोरे यांना विचारले असता, राजसाहेब उद्या ठाण्यातील सभेत यावर बोलतील व आणखी काही गोष्टी स्पष्ट करतील, असे मोरे यांनी सांगितले. ठाण्यात उद्या मंगळवारी होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे यांनी आपल्याला बोलावल्याचे मोरे यांनी सांगितले आहे. आजच्या राज ठाकरे यांच्या या भेटीनंतर मोरे यांनी एक खास ट्वीटही केले आहे. मी माझ्या साहेबांसोबत…आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…! असे म्हणत वसंत मोरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये ‘जय श्रीराम’चा नाराही दिला आहे.